पुणे : अन्न, कपडे आणि वस्तूंसह अनेक कारणांमुळे मानवाकडून अनेक प्राण्यांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवून प्राण्यांच्या हक्क-अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी भारतातील प्राणी प्रेमींनी एकत्र येऊन आज विराट प्राणी मुक्ती मोर्चा काढला होता. यामध्ये प्राणी शोषण मुक्ती क्षेत्रात काम करणारे देशासह परदेशातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्राणी हक्कांविषयी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्राणी हे देखील आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असून त्यांचे संरक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे हे अधोरेखित करण्यासाठी या मोचार्चे आयोजन केले होते.
जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान येथून सुरू झालेला हा मोर्चा डेक्कन, फर्ग्युसन रोड मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौकातून मॉडर्न कॉलेज मार्गे पुन्हा संभाजी उद्यान येथे आला. त्याठिकाणी या मोचार्चा समारोप झाला. रविवारी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात ३०० च्या आसपास कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात फिनलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदी देशांतील प्राणीमित्र कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यापूर्वी बंगलोर, मुंबई याठिकाणी मोर्चा काढण्यात आला असून येत्या काळात दिल्लीला देखील मोठ्या संख्येने आंदोलन करणार असल्याचे अॅनिमल लिबरेशन मार्चच्या वतीने सांगण्यात आले. देशातील वेगवेगळ्या भागातील तरुण कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होत आहेत. प्राण्यांशी होणारा दुर्व्यवहार, त्यांच्याशी केले जाणारे कृर वर्तन आणि त्यांना मिळणारे असुरक्षित वातावरण या सगळ्या विरोधात काढण्यात आलेल्या या विराट मोर्चात पशु अधिकार आणि मुक्तता यावर विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. सुमारे तीन तास चाललेल्या या मोर्चाव्दारे विगन जीवनशैली आणि प्राण्यांच्या प्रति असलेली आपली पक्षपाती वागणूक यावरील संदेश लक्षवेधी ठरले.
प्राणीमुक्ती मोर्चा आजपर्यंत आयोजित केलेल्या सर्व मोर्चांपेक्षा मोठा आणि आगळा वेगळा होता. प्राण्यांचे शोषण बंद व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी हातात संदेश फलक घेऊन जनजागृती केली. या मोर्चाच्या माध्यमातून भारतातील विगन चळवळ आणि विविध प्राणी हक्क व संवर्धन समुदायाच्या एकतेचे दर्शन घडले. प्राण्यांचे संरक्षण करणे हा मुख्य हेतू मोर्चामागील आहे. शाकाहारी होणे ही विचारपध्दती आहे. त्याचा दैनंदिन जीवनमानात प्रत्येकाने उपयोग करणे गरजेचे आहे. - आमजोर चंद्रन, संघटक व आयोजक अॅनिमल लिबरेशन मार्च