पुणे:- बहुजन समाजाच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडणारे, शोषित आणि पीडितांमध्ये आपल्या हक्कांसाठी बंडाची मशाल पेटवणारे आणि साहित्याद्वारे वैश्विक झेप घेऊन मानवतावादाचा ध्वज उंचावणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवांकीत करावे, अशी मागणी अण्णाभाऊ साठे यांच्या शेकडो विचार समर्थकांनी बुधवारी क्रांतीज्योत आंदोलनाद्वारे केली.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने झोपडपट्टी सुरक्षा दल, दलीत विकास आघाडी आणि कामगार सुरक्षा दलातर्फे या क्रांतीज्योत आंदोलनाचे आयोजन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावापासून 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ झाला. तेथून कराड-सातारा-खंडाळा-शिरवळ आणि पुणे यामार्गे क्रांतीज्योतीचे सारसबाग येथील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आगमन झाले. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग असलेली क्रांतीज्योत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य महामोर्चा द्वारे नेण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि अण्णा भाऊंच्या जयघोषाने दुमदुमलेल्या आंदोलनाद्वारे कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. यानंतर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने अण्णाभाऊ साठेंना गौरवांकीत करण्याच्या मागणीचे निवेदन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ’भारतरत्न’ द्या : क्रांतीज्योत आंदोलकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 11:17 AM
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावापासून 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ झाला.
ठळक मुद्देअण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन