पुणे: पुणे महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये ठेकेदारांमार्फत नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुढील दोन दिवसांत दिवाळी बोनस द्यावा, असे आदेश महापालिकेचे कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी काढले आहेत.
पालिकेत सुमारे ९ हजार कंत्राटी कामगार असून, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस, सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी कामगारा संघटनानी महापालिकेपुढे उपोषण सुरू केले होते. कंत्राटी कर्मचारी आणि कायम कर्मचारी समान काम करत असल्याने कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस मिळावा, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर पालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना बोनस देण्याचे आदेश सहायक कामगार आयुक्त नि. अ. वाळके यांनी काढले आहेत. त्यानंतर महापालिकेने ठेकेदारांची बैठक घेत त्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या सर्व विभाग, क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ कार्यालयांनी कंत्राटी मनुष्यबळ पुरविलेल्या ठेकेदारांना दिवाळी बोनस दोन दिवसांच्या आत देण्याचे परिपत्रक काढले आहे. याचा लाभ सुमारे साडेनऊ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.