वारजे : देशभर बुधवारी साजऱ्या होणाºया बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीसाठी खरेदीकरिता होणाºया खर्चाला कात्री लावावी आणि हा निधी केरळमधील पूरग्रस्त बांधवांना हस्तांतरित करण्याचे आवाहन वारजे येथील एक मुस्लिम तरुण करीत आहे. विशेष म्हणजे, रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनीही अवघ्या २४ तासांत सुमारे २५ हजार रुपये जमादेखील केले. पैगंबर शेख असे या तरुणाचे नाव असून तो वारजे येथील रामनगर भागात राहतो.केरळवासीयांना मदत करण्यासाठी रविवारी त्याने आपल्या फेसबुक वॉलवरून लाईव्ह व्हिडीओद्वारे आवाहन केले. कुर्बानीसाठी काही नागरिक खर्च करीत असतात. यासाठी मोठा व विशेष बोकड खरेदी करण्याच्या पवित्रा अनेक जणांचा असतो. अल्लाह् हा फक्त आपली नियत व भावना पाहत असतो.आपण केवळ पाहत न राहता या कठीण काळात मदत केली पाहिजे. यासाठी फक्त मुस्लिमच नाही, तर सर्व धर्मीय बंधू-भगिनींना त्याने आवाहन केले आहे. त्याच्या आवाहनाला सर्व समाजातून प्रतिसाद मिळत आहे. निधी हस्तांतरित केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या फेसबुक पेजवर प्रसारित करण्याचे आवाहनदेखील त्याने केले आहे. ज्याने इतरांना अशी मदत करण्यास चालना मिळेल.पैगंबर शेख हा छत्रपती शिवरायांचा कट्टर समर्थक असून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्याने गेल्याच आठवड्यात संविधान सन्मान सभेत सहभागी होण्याच्या केलेल्या आवाहनालादेखील खूप प्रतिसाद मिळाला होता. तो स्वत:देखील या सभेत सामील झाला होता. याशिवाय, गडसंवर्धन व गड भटकंती मोहिमेतदेखील तो सहकाºयांसह अग्रेसर आहे.बकरी ईदच्या तुमच्या कुर्बानीतील काहीच अंश अल्लाह्पर्यंत पोहोचत नाही. पोहोचते ती फक्त तुमची नेक भावना. या ईदला जर आपण केरळवासीयांच्या दु:खावर अशा प्रकारची मदत करून काहीअंशी फुंकर मारायचा प्रयत्न केला, तर अल्लाह्पर्यंत आपली अजूनच नेक भावना पोहोचेल, असे मला वाटते. माझ मित्र समीर नदाफ याने बोकडाच्या खरेदीतील हिस्सा कमी करून व मुलीच्या वाढदिवसाच्या खर्चात कपात करून ३ हजार रुपये केरळ मुख्यमंत्री निधीमध्ये ट्रान्सफर केले आहेत. निधी हस्तांतरित करण्यासाठी आॅनलाईन ट्रान्सफर सुविधा उपलब्ध असून त्यासाठी सरकारने स्टेट बँकेचे खाते उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय, पेटीएम या आॅनलाईन पेमेंट प्रणालीमध्येदेखील केरला / कोडगू फ्लड या नावाने पेमेंटची लिंक उपलब्ध आहे.- पैगंबर शेख
बकरी ईदचा खर्च द्या केरळच्या आधारासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 4:27 AM