पुणे: राज्यासाहित पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे रुग्ण गंभीर अवस्थेत जाऊन त्यांना व्हेंटिलेटरची गरज भासू लागली आहे. सीएसआर आणि शासकीय निधीतून व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र प्राधान्याने ते शासकीय संस्थांना देण्यात आले आहेत. परंतु शासकीय संस्थांमधील अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक गोष्टी यामुळे व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहेत. असे वापरात नसलेले पण वापरण्यायोग्य व्हेंटिलेटर खासगी संस्थांना द्यावेत. अशी सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय यंत्रणेला पत्राद्वारे केली आहे.
खासगी आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळ आणि तांत्रिक गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. व्हेंटिलेटरचा वापर पूर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने ते शासकीय रुग्णालयात देण्यात आले आहेत. पण मनुष्यबळ अभावी त्यांचा वापर होत नाहीये. खासगी संस्थांमध्ये ऑक्सिजन बेड, अतिदक्षता बेड आणि प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध आहेत. या व्हेंटिलेटरचा वापर कोव्हिडं रुग्णांसाठी होईल. असा करारनामा करून ते वापरण्यासाठी द्यावेत. शासनाने आकारलेल्या दरातून रुग्णांना उपलब्ध करून द्यावेत. असेही त्यांनी पत्रातून नमूद केले आहे. पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत जाऊ लागले आहेत. रुग्णांचा बेड आणि व्हेंटिलेटर न मिळल्याने जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटरचा तुटवडा भासू लागला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून व्हेंटिलेटरचा पुरवठा हळूहळू होत आहे. पण ते वापरण्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा त्यांच्याकडे नाही. अशा परिस्थितीत खासगी संस्था व्हेंटिलेटर वापरण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आले आहे. त्यांना अल्पदरात व्हेंटिलेटर देणे गरजेचे आहे.