लोककलावंतांना आर्थिक मदत द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 07:45 PM2020-05-04T19:45:25+5:302020-05-04T19:46:12+5:30
यावर्षीचा हंगामाच वाया गेल्याने लोक कलावंतासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा
बारामती : मराठी नाट्य व लोककलावंताना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
पुणे शहर जिल्ह्यातील मराठी नाटय कलावंत ,संगीतबारी ,लावणी नृत्य कलावंत ,पडद्या मागील कलावंत (बॅक स्टेज आर्टीस्ट ) या सर्वांचे हातावरचे पोट आहे. नाटक , लावणी नृत्याचे प्रयोग झाल्याशिवाय त्यांना मानधन मिळत नाही व कोरोनामुळे सर्व कार्यक्रम बंद असल्याने त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना आर्थिक मदत मिळायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऐन यात्रा उत्सवाच्या काळात कोरोना साथीमुळे अनेक देवस्थान व गावांच्या यात्रा-जत्रा रद्द करण्यात आल्या त्यामुळे या काळात होणारे लावणी, लोकानाट्य तमाशा, संगीतबारीचे कार्यक्रम रद्द झाले. यावर्षीचा हंगामाच वाया गेल्याने लोक कलावंतासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या कलावंतांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आली आहे