लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पोतराज समाजाकडे आजही उपेक्षित नजरेने पाहिले जाते; परंतु त्या समाजातील मुले आज शिक्षण घेऊन प्रगती करण्याबरोबरच लोककलादेखील जोपासत आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याबरोबर आपली बहुमोलाची संस्कृती टिकविणेदेखील गरजेचे असल्याचे मत, मत इतिहासतज्ज्ञ डॉ. सदाशिव शिवदे यांनी येथे व्यक्त केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत हा कार्यक्रम झाला. डॉ. शिवदे यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शाहिरा इंद्रायणी पाटील आणि पोतराज समाजातील लोककलावंत सुखदेव साठे यांना गौरविण्यात आले. या वेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रभाकर ओव्हाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, प्रा. शाहिरी संगीता मावळे आदी उपस्थित होते. या वेळी शाहीर आत्माराम पाटीललिखित संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील पोवाडा शाहिरा इंद्रायणी पाटील यांनी सादर केला. तसेच, पोतराज सुखदेव साठे यांनी शिक्षणावर आधारित गीत सादर केले. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी प्रास्ताविक केले. शाहीरा रूपाली मावळे-देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण कुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.
संस्कृतीसाठी लोककला जपावी
By admin | Published: May 11, 2017 4:57 AM