इंदापूर-निमसाखर (पुणे) : सरकार बदलल्याशिवाय सामान्य लोक, शेतकरी व दूध उत्पादक यांच्यासाठीची ध्येय धोरणे प्रत्यक्षात आणता येणार नाहीत. सरकार बदलण्यासाठी व ध्येय धोरणे ठरवण्याचे अधिकार तुमच्या हातात देण्यासाठी मला चार-सहा महिन्यांचा वेळ द्या, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निरवांगी (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.
इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी निरवांगी गावास भेट दिली. दरम्यान ते म्हणाले की, दहा वर्षे माझ्याकडे देशाच्या कृषी खात्याचा कारभार होता. कर्जमाफी त्याच वेळी झाली. साखरेचे, उसाचे दर कोणी वाढवून दिले? असा सवाल त्यांनी केला. ज्यांनी सत्ता दिली, त्यांच्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. आज जे सत्तेत आहेत, त्यांना या गोष्टीत कितपत रस आहे हे मला माहीत नाही. आजच्या परिस्थितीत संसार चालवण्यासाठी दूध व्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. दूध दरवाढीसाठी आपल्याला सरकारकडे म्हणणे मांडावे लागेल. सर्व दूध उत्पादकांना शंभर टक्के पाच रुपये अनुदान मिळालेच पाहिजे. आपले म्हणणे मांडूनदेखील जर सरकार त्यावर तोडगा काढत नसेल तर, आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. त्यासाठी माझी तयारी आहे, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी आदी गावांचा शरद पवार यांनी दौरा केला. आम्हाला विधानसभा जिंकायची आणि राज्य हातात घ्यायचेय त्याला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे, तालुका महिला अध्यक्ष छाया पडसळकर, इंदापूर महिला शहराध्यक्ष रेश्मा शेख आदी उपस्थित होते.
विरोधात उभे ठाकलेले समारंभात एकत्र -
लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले शरद पवार, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील एका विवाह समारंभाच्या निमित्ताने इंदापुरात एकत्र आले होते. त्यावेळी शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांनी एकमेकांशी चर्चाही केली.