पुणे : भारत देशाचे वीर जवान युद्धामध्ये धारातीर्थी पावले. त्यांच्या आठवणी श्रद्धेने लक्षात ठेवून सामान्य माणसाने याची दखल घ्यावी. आपण सकाळी उठल्यावर देवाला नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सैनिकांनाही नतमस्तक व्हावे. या वीर शहीदसैनिकांना देवाचे स्थान द्या, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवार आयोजित शहीद सैनिकांच्या वीरमातांचा सन्मान आणि भाऊबीज कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ माजी क्रीडापटू अरुण दातार, रोटरी क्लब पूना मिडटाऊन सचिव अलका मोतीवाले, सेवा मित्रमंडळ अध्यक्ष शिरीष मोहिते, नारद मंदिर माजी उपाध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, आदर्श मित्रमंडळ अध्यक्ष उदय जगताप उपस्थित होते. १९६५, १९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध, १९८५ची नागालँड मोहीम, १९९९ चे कारगिल युद्ध अशा युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या १४ वीरमातांचा सन्मान सोहळा साजरा केला.गोखले म्हणाले की, सैनिकाला नमस्कार करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. समाजाने दोन व्यक्तींचा नेहमी आदर केला पाहिजे. पहिला म्हणजे सैनिक आणि दुसरा म्हणजे ज्या व्यक्तीमुळे आपले पोट भरते तो शेतकरी. सैनिक हा रात्रंदिवस जागून, देशाचे रक्षण करीत असतो. त्याने दिलेल्या बलिदानाची आपण सर्वांनी जाण राखली पाहिजे. माझ्या कुटुंबात मुलगा, भाचे, जावई हे सर्व सैनिक या विषयाशी निगडित आहेत. त्यामुळे या वीर जवान लोकांबद्दल तूर्त अभिमान आहे. वीर मातांच्या पत्नी, मुले, पती युद्धांमध्ये शहीद झाले या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नये. देशाचे रक्षण करून त्यांनी बलिदान दिले याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. तुम्ही वीरमाता एकट्या नसून सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे.प्रत्येकाने दररोज एक रुपया द्यावामी सर्वांना आवाहन करतो की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने दररोज एक रुपया जरी या सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी दिला. तरी हे आर्थिक दृष्ट्या संपन्न राहतील.