पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आंबिल ओढ्यालगतची व दांडेकर पुलाजवळील साडेचार एकर जागेतील मनपा कॉलनी (वसाहत) खासगी व्यावसयिकाला विकसित करण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे़ साने गुरुजी नगर बचाव कृती समितीने याबाबत नुकतीच बैठक घेऊन या कॉलनीतील घरे मनपा सेवकांना मालकी हक्काने द्यावीत, अशी मागणी केली आहे़
साने गुरुजी वसाहतीत साडेचार एकर जागेत ११ इमारती, ६ बैठ्या चाळी असून, यात ४५० खोल्या आहेत़ पुणे शहराची स्वच्छता करणारे बहुतांशी कर्मचारी व पालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी बहुतांशी प्रमाणात येथे राहतात़ गेली तीस वर्षे येथील नागरिक लढा देत असताना कॉलनीत केवळ शंभर घरे बांधण्यास व बीओटी तत्वारील प्रकल्पाला समितीने विरोध केला असल्याची माहिती समितीचे सल्लागार अॅड. गणेश सातपुते यांनी दिली आहे़