जुन्नर - कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूसनंतर आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर हापूसला स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी आंबा उत्पादक शेतकरी पाठपुरावा करत आहेत. जुन्नर तालुक्यातील हापूस आंब्याच्या जीआय मानांकनासाठीच्या न्यायालयीन लढ्यासाठी शास्त्रोक्त माहिती गोळा करण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र दिले आहे. याबाबत सर्व माहितीचे संकलन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने जीआयसाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे.राज्याच्या प्रत्येक विभागातील फळ व पिकांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. आंब्यांमध्ये कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जुन्नरचा हापूसदेखील प्रसिद्ध असून, या आंब्याला मुंबईमध्ये मोठा ग्राहक असून मोठी मागणी असते. जुन्नर तालुक्याच्या शेतकºयांनी १०० वर्षांपूर्वी आंब्याची मोठी लागवड केलेली होती. येणेरे, काले, दातखिळवाडी, निरगुडे, बेलसर, राळेगण, शिंदे, कुसूर, माणिकडोह या गावांचा समावेश आहे. अनुकूल हवामानामुळे हापूसचे दर्जेदार उत्पादन होत असून, वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध असून, मुंबई बाजारपेठेत जुन्नर हापूस म्हणून विक्री होत आहे.कोकणातील आंब्याचा हंगाम मार्च-एप्रिलमध्ये संपतो. तर जुन्नर हापुस आंब्याचा हंगाम मे महिन्यात सुरू होतो. जुन्नर हापूसला स्वतंत्रपणे भौगोलिक निर्देशांक मिळणे गरजेचे आहे. हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादकांची माहिती आकडेवारीसह संकलीत करण्याचे आदेश कृषी विभागाला द्यावेत, अशी खासदार आढळराव यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.जुन्नर हापूसलादेखील १०० वर्षांची परंपरा आहे. कोकण हापूसपेक्षा जास्त दराने जुन्नर हापूसची विक्री होत आहे. यामुळे मुंबई मार्केटमध्ये जुन्नर हापूसची विशेष ओळख निर्माण झालेली आहे. त्याप्रमाणे जुन्नर हापूसला जीआय मानांकन मिळाले पाहिजे, असे आंबा उत्पादक व विक्रेते उल्हास नवले यांनी सांगितले.
जुन्नर हापूसला स्वतंत्र निर्देशांक द्या, खासदार आढळरावांचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 1:33 AM