महुडे : भारतीय डाक विभागातील ग्रामीण डाक सेवकांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळावी, अशी मागणी पुणे जिल्हा ग्रामीण डाक सेवक संघटनेने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात जिल्हा अध्यक्ष महेंद्र राऊत व सचिव एकनाथ मंडलिक म्हणाले की, कोरोना महामारीने उग्र रूप घेतले असताना, गावागावांत भयानक परिस्थिती असताना डाक विभागातील ग्रामीण भागातील ग्रामीण डाक सेवक यांचे पूर्वीसारखीच दैनंदिन कारभार चालू आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण डाक सेवक ३० ते ४० वर्षे आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत.
सध्यातरी ग्रामीण डाक सेवकांना डाक विभागाने (पोस्ट खात्याने) खात्यात समाविष्ट करून घेतलेले नाही. सध्याची बिकट परिस्थितीत ग्रामीण भागातील डाक सेवक सेविंग, रिक्रिंग डिपॉजिट, सुकन्या योजना, विमा, आयबीपी, एईपीसचे व्यवहार, साधे टपाल, स्पीड पोस्ट, रजिस्टर, पार्सल यांसारख्या अत्यावश्यक सेवा कोरोना काळातही देत आहे. तरीदेखील भारतीय डाक विभाग ग्रामीण डाक सेवकाकडे दुर्लक्ष करीत आहे. खात्यात समाविष्ट करून घेत नाहीत असे का?. डाक खात्यातील कर्मचाऱ्यांना विमा कवच आहे. त्याच खात्यातील ग्रामीण डाक सेवकांना विमा कवच नाही, असा दुजभाऊ का ? असा प्रश्न पडत आहे. सध्या कोरोनाची स्थिती ग्रामीण भागात जास्त असताना ग्रामीण डाक सेवकांना ५० लाखांचे विमा कवच मिळावे म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण डाक सेवक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र राऊत व एकनाथ मंडलिक यांनी संघटनेच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत निवेदन देण्यात आले आहे. याबाबत खा. कोल्हे यांनी संसदेत आवाज उठवावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.