पुणे : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण केलेल्या स्वयम् या उपग्रहाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणेमधील (सीओईपी) विद्यार्थी व प्राध्यापकांना महापालिकेच्या वतीने खास भेट देण्यात आली. या महाविद्यालयाच्या शेजारीच असलेल्या उड्डाणपुलाला सीओईपीचे नाव देण्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी केली.महापालिकेच्या वतीने सीओईपीचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, सीओईपीचे डॉ. बी. बी. अहुजा या वेळी उपस्थित होते.खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘सीओईपीसारख्या संस्थेला स्वायत्तता मिळणे अपेक्षित आहे. सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत. उड्डाणपुलामुळे संस्थेला त्रास होणार असल्याने साऊंड बॅरिअर, अंडरपास आणि स्कायवॉकची मागणी होत आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत.’’ सीओईपीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काही निधी मिळावा, यासाठी खासदारांच्या शिष्टमंडळामार्फत केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सुळे यांनी दिले. उड्डाणपुलासाठी जागा दिल्याबद्दल महापौरांनी सीओईपीचे आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी मदत म्हणून ३ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. (प्रतिनिधी)- खासदार सुळे यांनी संचेती चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला जगप्रसिद्ध अभियंते डॉ. सर विश्वेश्वरय्या यांचे नाव देण्याची सूचना केली. डॉ. माशेलकर यांनी त्यावर या उड्डाणपुलाला सीओईपीचे नाव द्यावे, असे सुचविले. त्याला सभागृहात उपस्थित सर्वांनी त्वरित मान्यता दिली. त्यामुळे महापौरांनाही लगेचच ही सूचना मान्य करीत उड्डाणपुलाला सीओईपीचे नाव देत असल्याची घोषणा केली.या वेळी बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘स्वयंमचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. या निर्मितीमध्ये असंख्य घटकांचे मोठे योगदान आहे. गुणवत्ता व उपयुक्ततेचे हे आदर्श उदाहरण असून, अन्य संस्थांनीही त्याची दखल घ्यावी. अलीकडच्या काळातील देशाच्या प्रगतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग आहे. भारतीय बुद्धिमत्ता कुठेही कमी पडणारी नाही, हे यातून सिद्ध होत आहे.’’
उड्डाणपुलाला सीओईपीचे नाव देणार
By admin | Published: July 06, 2016 3:22 AM