पुणे : पुण्याची ओळख जगभर पोहोचली. इथली कर्तुत्वान माती आणि सांस्कृतिक चळवळ समाजासह जगायला अभिप्रेत आहे. त्यामध्ये महामेट्रोची भर पडली आहे. पुण्यात होणाऱ्या महामेट्रो स्टेशनला महापुरुषांची नावे देऊन त्यांचा सन्मान करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. त्याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेडनं महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलं आहे. या पत्रात १३ महापुरुषांची नावंही त्यांच्याकडून सुचवण्यात आली आहेत.
पुणे हे विद्येचे माहेरघर असून सांस्कृतिक, परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीचा वसा आणि वारसा जपणारे शहर आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी वसवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच पुण्यातून रोवली. पुणे जिल्ह्याने दोन छत्रपती दिले. मल्हाराव होळकर, राजमाता अहिल्याराणी होळकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद साळवे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, सरसेनापती वीर बाजी पासलकर आदी समाजसुधारकांच्या व महापुरुषांच्या विचारधारेतून हे पुणे नटलेलं आहे. या महापुरुषांचा वैचारिक व वारसा आपण जपला पाहिजे. म्हणून त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी म्हणून वैचारिक ठेवा जपान करण्याचं काम आपण केले पाहिजे असं निवेदनातून नमूद करण्यात आलंय.
मेट्रो स्टेशनला देण्यात येणाऱ्या महापुरुषांची नावे
१) छत्रपती शिवाजी महाराज२) छत्रपती संभाजी महाराज३) मल्हाराव होळकर४) राजमाता अहिल्या राणी होळकर५) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज ७) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले८) लहुजी वस्ताद साळवे९) दिनकरराव जवळकर१०) केशवराव जेधे११) सरसेनापती वीर बाजी पासलकर १२) महादजी शिंदे१३) शिवशाहीर अण्णाभाऊ साठे
या मागणीचे निवेदन महा मेट्रोच्या गाडगीळ यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड'चे महाराष्ट्र प्रदेशसंघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, विकास शिंदे, उपाध्यक्ष महादेव मातेरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, सुभाष जाधव, सुनिल जगताप आदी उपस्थित होते.