पुणे : ज्येष्ठ काँग्रेस निष्ठावंतांनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना एक पत्र पाठवून पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षात किमान काही वर्षे काम केलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र त्याचबरोबर पक्षाचा उमेदवार बाहेरून येण्याबाबत बरीच चर्चा सुरू असल्याने पक्षाची बदनामी होत असून, आमच्या मागणीचा विचार करावा, पण पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्ही काम करू अशी मखलाशीही केली आहे.माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांनी हे पत्र पाठवले आहे. गेले काही दिवस काँग्रेसचा उमेदवार बाहेरून लादला जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्यापैकी काही इच्छुक उमेदवारांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत पक्षाच्या अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत. त्यावरून पक्षात बरेच वादंग सुरू आहे.पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा जुना पारंपरिक मतदारसंघ आहे. पक्षासाठी निवडून येण्याची क्षमता हा उमेदवारी देण्यासाठीचा पहिला निकष असतो, मात्र तरीही उमेदवार पक्षातील असावा, त्याने किमान काही वर्षे पक्षात राहून काम केलेले असावे याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे जरा जास्त होत आहे अशी भीती वाटून की काय पण तिघांनीही पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी तयार असल्याचेही नमूद केले आहे. यातील बाळासाहेब शिवरकर यांनी थेट दिल्लीत जाऊन पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, तर उल्हास पवार यांनी ‘पक्षाच्या निष्ठावंतांना टाळले जात आहे, त्यांचा विचार केला जात नाही, पक्षाच्या बाहेर असलेल्यांना संधी का दिली जाते, असा प्रश्न उपस्थित करणारे व स्वत: उमेदवार म्हणून तयार असल्याचे पत्र थेट राहुल गांधी यांनाच लिहिले होते.उद्या नाव जाहीर होण्याची शक्यताकाँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावरचा पडदा शनिवारी उठण्याची शक्यता आहे. दिल्लीत केंद्रीय निवड मंडळाची बैठक होत असून, त्यासाठी पुण्यातील इच्छुक शुक्रवारी रात्रीच दिल्लीला गेले आहेत. त्यात पक्षातील इच्छुकांबरोबरच पक्षाबाहेरील इच्छुकांचाही समावेश आहे.
पक्षातीलच उमेदवार द्यावा; कॉँग्रेस निष्ठावंतांचे राहुल गांधींना पुन्हा साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 7:00 AM