पिंपरी : मराठा आरक्षणासाठी पुण्यातील खेड येथे शुक्रवारी आयोजित मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेत माथेफिरूने गोंधळ घातल्याची घटना घडली. यामुळे सभास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. संबंधित युवकाच्या हाती एखादे शस्त्र असते तर अनुचित प्रकार घडला असता. त्यामुळे जरांगे-पाटील यांना पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे यांनी गृह विभागाकडे केली आहे.
काळे यांनी सांगितले की, जरांगे-पाटील यांच्या सभेत माथेफिरू युवकाने सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मला बोलू द्या, अन्यथा मी आत्महत्या करीन, असा आग्रह धरत गोंधळ घातला. जरांगे-पाटील यांच्या हातातील माईक जबरदस्तीने हिसकावून घेतला. जरांगे-पाटील यांना समाजकंटकांकडून त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविषयी गैरसमज पसरविला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा लढवय्या सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना पोलिस विभागाकडून संरक्षण मिळावे. तसेच सभेत गोंधळ घालणाऱ्या युवकाची चौकशी करण्यात यावी.