लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत पूजाचा लॅपटॉप भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याबाबत संशय व्यक्त केला आहे. पूजाचा मोबाइल घोगरे व सुरेश तेलंग यांना मिळाला, त्या परिस्थितीत लॅपटॉपही त्यांच्याकडे असल्याचे तपासात प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे लॅपटॉप चौकशीसाठी आणून द्यावा, अशी नोटीस वानवडी पोलिसांनी घोगरे यांना पाठविली आहे. पोलिसांच्या या नोटिशीचा भाजपने निषेध केला आहे.
पोलिसांनी घोगरे यांना बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे की, पोलीस तपासात पूजा हिच्या खोलीच्या बेडरूमचा दरवाजा आतून कडी लावून बंद असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी पंचनामा करेपर्यंत दरवाजा कोणीही उघडलेला नव्हता. या खोलीला ॲटॅच गॅलरी असून तिचा दरवाजा उघडला होता. ८ फेब्रुवारीला दुपारनंतर घोगरे व त्यांचा कार्यकर्ता सुरेश तेलंग यांनी पोलीस ठाण्यात येऊन पूजाचा घटनास्थळाच्या पार्किंगमध्ये मिळालेला माेबाइल हजर केला. याप्रकरणी काही ऑडिओ व फोटो हे व्हायरल झालेले आहेत. साक्षीदारांनी चौकशीत लॅपटॉप घोगरे यांच्याकडे असल्याबाबत संशय व्यक्त केला आहे.