लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातल्या कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता पुणेकरांचे लसीकरण सर्वांत आधी करावे यावे, अशी मागणी पुणे प्लॅटफॉर्म फाॅर कोविड रिस्पाॅन्सने केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांना त्यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे.
कोरोना पुण्यामध्ये सर्वाधिक पसरला असताना सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्स अँण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने पुढाकार घेऊन शासकीय अधिकारी, शहरातील सर्व प्रमुख रुग्णालयांचे पदाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी आणि पुण्यातल्या एमसीसीआयएचे सदस्य यांनी समन्वयासाठी या गटाची स्थापना केली होती.
गेल्या काही दिवसांत वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आता या गटाने कोरोना लसीची मागणी केली आहे. पुण्यात ‘पाॅझिटिव्हिटी रेट’ दहा टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रुग्णांच्या संख्येत देखील गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन मागणी केली असून, यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची वेळही मागितली असल्याचे पुणे प्लॅटफॉर्म फाॅर कोविड रिस्पाॅन्सचे प्रमुख सुधीर मेहता यांनी सांगितले.
सिरम इन्स्टिट्यूट या पुण्यातल्या कंपनीकडून कोविडची लस तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडे याचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे या लशींचा वापर करून लसीकरण करण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मेहता यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “ पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळेच सरकारने ठरवलेल्या क्रमानेच मात्र अधिक वेगाने पुणेकरांचे लसीकरण व्हावे. पुढील तीन महिन्यांत जर हे लसीकरण पूर्ण झाले तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळू शकतो. ‘सिरम’कडे लस शिल्ल्क आहे आणि ती पुण्यातच आहे. त्यामुळे पुणेकरांचे लसीकरण पूर्ण करावे, असे आमचे म्हणणे आहे.”