खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षीपासून देशात कोविडचे संकट सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. मागील वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पुन्हा शेतीची कामे सुरू केली असतानाच खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमती ६० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परवड होणार आहे. यासंदर्भात, खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था सरकारला माहिती आहे. एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळं अशा अस्मानी संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमच आवाज उठवणार आहोत, असा विश्वास खा.कोल्हे यांनी व्यक्त केला.
खत दरवाढ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्या: डॉ. अमोल कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:09 AM