पुणे : कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक स्थिती घालावली आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्कात कपात झाली, तर थोडासा दिलासा पालकांना मिळू शकतो. पण शाळांच्या शुल्कात कपात करू नये, अशी भूमिका आघाडी सरकारची आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो, असे बोलून आम आदमी पार्टीने (आप) काँग्रेस भवनसमोर सोमवारी दुपारी निदर्शने केली.
शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री आहेत. कोरोनाने सर्वसामान्यांची दैना केली आहे. शाळा भरतच नाही तर शुल्क वाढ कशासाठी हा त्यांचा साधा प्रश्न आहे. त्याकडे दुर्लक्ष करून गायकवाड व महाविकास आघाडी सरकार शिक्षणसंस्था चालकांच्या मागे उभे रहात आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
देशात दिल्लीसह राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू व इतर अनेक राज्यांंनी शैक्षणिक फीमध्ये सवलत दिली आहे. महाराष्ट्रात मात्र ती नाकारली जात आहे.
आंदोलनात अभिजित मोरे, अनुप शर्मा, सैद अली, विद्यानंद नायक, संदेश दिवेकर, संदीप सोनवणे, किशोर मुजुमदार, सुरेश पारखी, स्मिता पवार-मुलाणी, वहाब शेख, माधुरी गायकवाड, श्रीकांत आचार्य, सूर्यकांत कांबळे, नरेंद्र देसाई, चांद मुलानी, उमेश बागडे, ऋषिकेश मारणे, आनंद अंकुश, सतीश यादव, ज्ञानेश्वर गायकवाड व आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. सामान्यांंना वाऱ्यावर सोडून धनदांडग्या शिक्षण सम्राटांना सरकारचा पाठिंबा आहे हे यातून उघड झाले आहे, अशी टीका किर्दत यांनी केली.