पुणे: कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाय, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत मराठ्यांचा मोर्चा बंडगार्डन मार्गे पुण्यात दाखल झाला. नगर रोडवर सर्वत्र भगवं वादळ पहायला मिळाले. प्रत्येकाला मुंबईची ओढ लागली होती आणि त्याला जरांगे पाटील यांची जोड होती. बीड जिल्ह्यातील काही बांधवांनी तर बैलगाडीसह मुबईकडे कुच केली आहे. आरक्षण द्या अन्यथा आम्ही आलो बैलगाडी सकट, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी बुधवारी जरांगे पाटील यांचा ताफा पुण्यात दाखल झाला. यावेळी हजारो, लाखो मराठे त्यांच्या सोबत चालत होते. कोणी गाडीवर, कोणी दुचाकीवर तर कोणी पायी चालत निघाले होते. पंढरीची वारी जशी निघते अगदी तशीच ही आरक्षणाची वारी मुंबईकडे निघाली आहे. बंडगार्डन रोडवर जागोजागी मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. डोईवर भगवी टोपी आणि मुखी एक मराठा लाख मराठाचा नारा दिला जात आहे. मराठवाड्यातील सोनपेठ येथून आलेले सुरेश खडके, संजय शिंदे, रमेश पाटील म्हणाले, आमच्या कित्येक पिढ्या आरक्षण नसल्यामुळे मागे राहिल्या आहेत. आरक्षण हा आमचा हक्क आहे. त्यासाठी जरांगे पाटील हा माणूस लढतोय. त्याला साथ देण्यासाठी आम्ही सहभागी झालो आहोत. आमच्या खायची प्यायची सोय आम्ही केली आहे. पण ठिकठिकाणी अनेक मराठा बांधव आमच्या जेवणाची सोय करत आहेत. त्यामुळे आम्हाला आता कसलीही फिकिर नाय. आता ही लढाई जिंकल्याशिवाय मागे हटायचे नाय. सर्व समाज आता एक झालाय. राजकीय नेत्यांनाही लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागणार. राज्यात ज्यांची सत्ता हाय, त्यांची केंद्रात पण हाय. मग आरक्षण द्यायला काहीच अडथळा नाय. जर आरक्षणा दिले नाही तर मग सर्व मराठा समाज मतदानाची ताकद दाखवून देईल. मग बसावं लागेल बोंबलत सर्वांना.'' बीड जिल्ह्यातील बैलगाडी घेऊन आलेल्या बांधवांनी चारादेखील सोबत ठेवला आहे. जेणेकरून बैलांनाही कुठेही खाता येईल. स्वतः सोबत बैलाची शिदोरी घेऊन हे बांधव मुंबईकडू निघाले आहेत.