पुणे : पालिकेच्या हद्दीत २०१७ साली समावेश झालेल्या ११ गावांसाठी आधी ९ हजार कोटी द्या. मगच उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने पालिकेच्या हद्दीत समावेश करा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. गावे समाविष्ट करून घेण्यास आमचा विरोध नाही, पण आधीच्याच गावांमधील नागरी समस्या संपलेल्या नसल्याचे महापौर म्हणाले.
पालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविस्ट करण्याच्या हालचाली राज्य शासन स्तरावर सुरू आहेत. याविषयी महापौर म्हणाले, पालिकेच्या हद्दीत २०१७ साली समावेश करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये रस्ते, पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा नाहीत. तेथे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. रस्त्यांची दुरावस्था आहे. त्यातच नव्याने २३ गावांचा समावेश झाल्यास आणखी अडचणी वाढतील. त्यामुळे सरसकट समावेश न करता टप्प्याटप्प्याने करावा.
११ गावांचा विकास आराखडा तयार करून पायाभूत विकास करण्यासाठी ९ हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली. या गावांच्या पायाभूत सुविधा उभ्या करताना पालिकेवर आर्थिक ताण येत असल्याचे मोहोळ म्हणाले. त्यामुळे नवीन गावे समाविष्ट करताना राज्य सरकारने निधी द्यावा अशी आग्रही मागणी मोहोळ यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून गावे समाविष्ट करण्याचा निर्णय...
पुणे महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे 23 गावं पुणे महापालिकेत समाविष्ट होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात अध्यादेश काढण्याची प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट होतील, अशी माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे.