'सारथी' संस्थेला कायमस्वरूपी इमारतीसाठी जागा द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:03 PM2020-07-11T12:03:25+5:302020-07-11T12:03:43+5:30
सारथी संस्थेने सर्वंकष नियोजन सादर केल्यानंतर पुढील आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
पुण्यामध्ये सारथी संस्थेच्या कार्यालयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. कार्यालयातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
सारथी संस्थेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामकाजाची माहिती घेतली. सारथी संस्थेत झालेल्या बैठकीमध्ये सारथी संस्थेला कायमस्वरूपी नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तसेच कामाला योग्य दिशा व गती देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यास संदर्भातले आश्वासन देण्यात आले.
गरज ओळखून व भविष्याचा वेध घेऊन नवीन प्रकल्प तयार करण्यात यावेत तसेच जुन्या प्रकल्पांचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत असे निर्देश देण्यात आले.
तसेच संस्थेने पुढील दहा वर्षाचे 2020 ते 2030 व्हिजन डॉक्युमेंट चे सर्वंकष नियोजन केल्यानंतर पुढील आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
दोन दिवसापूर्वी सारथी संस्थेबाबत मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठ कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून तात्काळ देण्यात आला होता.
परंतु, सारथी संस्थेसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. तसेच अन्य प्रश्नाबाबत देखील लक्ष घालण्याची सूचना मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केली होती. या पार्श्वभूमीवर ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेची भेट घेत येथील कामकाजाची पाहणी केली.