लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषद क्षेत्रातून पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट होण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली आहे. आता ही २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे किती गट-गण रद्द करावे लागतील यांचा तपशील जिल्हा परिषद प्रशासनाकडून शासनाने मागविला आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकापूर्वी ही २३ गावे समाविष्ट करण्याची तयारी शासनाने सुरू केल्याचे स्पष्ट होते.
पुणे जिल्हा परिषदेचे मांजरी-शेवाळवाडी या गटातील दिलीप घुले, धायरी-नांदेड गटातील जयश्री पोकळे, नऱ्हे-आंबेगाव गटातील जयश्री भुमकर आणि मुंढवा-केशवनगर गटातील वंदना कोद्रे यांचे जिल्हा परिषद गट अंतिम अधिसूचनामध्ये संपुष्टात येणार आहेत.
याशिवाय पंचायत समितीचे गण देखील संपुष्टात येत आहे. यामध्ये शेवाळवाडी, आंबेगाव, धायरी, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, नांदेड यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हवेली पंचायत समितीच्या सभापती फुलाबाई कदम या नांदेड गटातून पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांचा गट संपुष्टात आल्यास हवेली पंचायत समितीचे सभापतिपद देखील रिक्त होणार आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण क्षेत्रातून महापालिका हद्दीत समाविष्ट होणारी गावे यांचा तपशील तसेच गट-गण रचनेमध्ये समाविष्ट गावांचा आराखडा राज्य शासनाला पाठवला आहे. गावे समावेशाची अंतिम अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झाली नसली तरी यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे आलेल्या हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर या गावांच्या समावेशाची अंतिम अधिसूचना काढण्याचा निर्णय शासन स्तरावर होणार आहे.