---
मंचर : कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दूरसंचार कंपन्यामधील नेटवर्क ऑपरेशन्स व मेंटेनन्स विभागातील कर्मचाऱ्यांना 'फ्रन्टलाइन कोविड-१९ कर्मचारी' म्हणून राज्य व केंद्र शासनाने मंजुरी देऊन सन्मानित करावे, अशी मागणी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय दूरसंचार मंत्री डॉ. रविशंकर प्रसाद यांच्याकडे केली.
यासंदर्भात, माजी खासदार आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील आरोग्य व पोलीस यंत्रणांनी कोरोना वॉरियर्स म्हणून आजपर्यंत उत्कृष्ट सेवा बजावली आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इंटरनेट व दूरसंचार यंत्रणेचा वापर कमालीचा वाढल्याने अखंडित मोबाईल नेटवर्क सुविधा व जास्तीत जास्त पारदर्शक सेवा पुरविण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात वाढून या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक्त ताण निर्माण होऊनही त्यांनी हे आव्हान लीलया पेलले व नागरिकांना उत्तम व सुरळीत सेवा पुरविण्याची जबाबदारी कसोशीने पार पाडली आहे. नागरिक व विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने एकमेकांना कनेक्ट राहता यावे यासाठी ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन परीक्षा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या शासकीय आढावा बैठका, आरोग्य तपासणी व त्यांचे रिपोर्ट, टेलीमेडिसीन सुविधा, ऑनलाईन पेमेंट तसेच वर्क फ्रॉम होम आदी इंटरनेटवर आधारित सुविधा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम उल्लेखनीय असून, या कामाची शासनाकडून दखल घेणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांनी कठीण प्रसंगात, ग्रामीण व शहरी भागात वैयक्तिक जोखीम पत्करून दिवसरात्र न पाहता तांत्रिक बिघाड तत्काळ दूर करून लोकांना अविरत इंटरनेट व दूरसंचार सेवा पुरविली आहे.गोवा राज्याने देखील नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत टेलीकॉम नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन कोविड कर्मचारी म्हणून दर्जा दिला आहे.
--
कोट
जीव धोक्यात घालून करताहेत काम
-
केंद्र सरकारच्या पार्लिमेंटरी समितीने बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील कोरोना योध्यांमध्ये समाविष्ट केले आहे.
कोरोना काळ सुरू झाल्यापासून देशातील व राज्यातील विविध खासगी दूरसंचार कंपन्यांमधील या कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून दूरसंचार यंत्रणा सक्षम ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून राज्य व केंद्र शासनाने सन्मानित करावे.
- शिवाजीराव आढळराव पाटील