स्थानिकांना विश्वस्तपदाची संधी द्या, अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल; सुप्रिया सुळेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:52 PM2023-05-30T12:52:10+5:302023-05-30T12:52:18+5:30

राजकारण विरहित आंदोलन केले जाईल, वेळ पडली तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून विनंती करू

Give the locals a chance for trusteeship, otherwise the agitation will have to change course; A warning from Supriya Sule | स्थानिकांना विश्वस्तपदाची संधी द्या, अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल; सुप्रिया सुळेंचा इशारा

स्थानिकांना विश्वस्तपदाची संधी द्या, अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल; सुप्रिया सुळेंचा इशारा

googlenewsNext

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या सेवेच्या माध्यमातून देवाची निस्सीम भक्ती आणि सेवेची जबाबदारी ग्रामस्थ पूर्ण करीत असतात. ही संस्कृती पुढे जतन करण्यासाठी जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिक व्यक्तींनाच संधी मिळाली पाहिजे,अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

जेजुरी देवसंस्थान कमिटीवर जेजुरीचे स्थानिक विश्वस्त नेमावेत या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सोमवार २९ रोजी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुलदैवत खंडोबा देवाचे मंदिर जेजुरीत आहे, जेजुरीतील प्रत्येक नागरिकाचे देवाशी भक्तीचे नाते आहे. यात्रा जत्रा, सण उत्सव, रूढी परंपरा ग्रामस्थांनी जतन केली आहे. असे असताना स्थानिक व्यक्तींना विश्वस्तपदाची संधी दिली गेली नाही. सातपैकी पाच विश्वस्त जोपर्यंत स्थानिक नियुक्त केले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. मी ही या आंदोलनात सहभागी राहील. राजकारण विरहित आंदोलन केले जाईल, वेळ पडली तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून विनंती करण्यात येईल असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी संभाजीराव झेंडे, सुदाम आप्पा इंगळे, हेमंतकुमार माहूरकर, माणिकराव झेंडे पाटील, पुष्पराज जाधव, विराज काकडे, जयदीप बारभाई, तानाजी जगताप, राहुल घाडगे व मोठ्या संख्येने जेजुरीकर आंदोलक उपस्थित होते.

दरम्यान, जेजुरीतील ग्रामस्थ व आंदोलकांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही बारामती विद्या प्रतिष्ठान येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी याबाबत मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 

Web Title: Give the locals a chance for trusteeship, otherwise the agitation will have to change course; A warning from Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.