लोकसभेला दिले तेच उत्तर आता विधानसभा निवडणुकीतही द्या- खासदार सुप्रिया सुळे
By राजू इनामदार | Published: July 6, 2024 05:25 PM2024-07-06T17:25:43+5:302024-07-06T17:26:22+5:30
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी देश कोणा एकाचा असू शकत नाही, तो तुमचा आमचा सर्वांचाच आहे असे सांगितले...
पुणे : त्यांनी लोकसभेला धमकावले, म्हणून तुम्ही त्यांना चांगले उत्तर दिले. आता विधानसभेलाही तेच उत्तर त्यांना द्या, असे आवाहन करत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीतही संघर्ष होणार असल्याचे सुचित केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी देश कोणा एकाचा असू शकत नाही, तो तुमचा आमचा सर्वांचाच आहे असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शहर शाखेच्या वतीने सुळे व डॉ. कोल्हे यांचा लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल सत्कार केला. हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंढवा परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जाहेद सय्यद, निलेश मगर, योगेश ससाणे, रवींद्र माळवदकर, हेमंत बधे, वंदना मोडक, सविता मोरे, रुपाली शिंदे, आसिफ शेख, पप्पू घोलप, दिपक कामठे, मोहमद्दीन खान, बाळासाहेब कवडे, आसिफ पटेल, रोहित गुंजाळ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत देशातील मतदारांनी काश्मीर ते कन्याकुमारी आपला भारत एक आहे हे दाखवून दिले. राज्यातील सरकारची मुदत भरतच आली आहे. लोकसभेला त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला, मात्र डरना मना है हे त्यांना तुम्ही दाखवून दिले, तेच आता विधानसभेलाही करा. डॉ. कोल्हे यांनी मतदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे सांगितले. विधानसभे बरोबरच महापालिका निवडणुक लढवू इच्छिणाऱ्यांचीही कार्यक्रमाला गर्दी होती. नेते उपस्थित असल्याने त्यांच्यातील काहींनी शक्तीप्रदर्शनही केले. शैलेश बेल्हेकर शादाब खान यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला.