कोरोना संचारबंदीच्या काळात होम क्वारंटाईन पालकांना मुलांबरोबर कसा वेळ घालवायचा? या चिंतेने ग्रासले आहे. ना उन्हाळी शिबिरे ना पार्कची सफर ना ट्रिपची मजा, मग मुलांना कुठं आणि कसं गुंतवून ठेवायचं? असा गहन प्रश्न पालकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी 'खेळां'सारखं दुसरं कोणतेही उत्तम माध्यम नाही असं वारंवार सांगणाऱ्या आणि सर्व वयोगटातील मुलांसाठी विविध शिबिरे व कौशल्यापूर्ण उपक्रमांची विविध दालने खुली करणाऱ्या गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांच्याशी ' लोकमत' ने संवाद साधला. मुलांबरोबर वेळ घालविण्याची चांगली संधी मिळाली आहे. अशा सकारात्मक विचारातून मुलांना शांत आणि आनंदी ठेवा असा बहुमोल सल्ला त्यांनी पालकांना दिला आहे.----------------------------------------------------------------------------------------------नम्रता फडणीस* या काळात पालकांनी मुलांशी कशाप्रकारे नातं निर्माण करायला हवं?- आजकाल बरेच पालक नोकरी करीत असल्यामुळे त्यांना मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवायला वेळ मिळत नाही. ही पालकांना सुवर्णसंधी मिळाली आहे असं मानून त्यांनी मुलांना अधिकाधिक वेळ द्यायला हवा. त्यांच्यासमवेत घरबसल्या अनेक खेळ खेळू शकतात. त्यांच्या बौद्धिकतेला चालना देणारे अनेक उपक्रम राबवू शकतात. त्यातून पालक-मुलांमध्ये एक चांगल नात तयार होईल आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती होईल. या काळात पालकांची जबाबदारी खूप मोठी आहे.* मग असे कोणते खेळ आहेत ते पालक-मुलांना एकत्रितपणे खेळता येऊ शकतात?- पालकांना वेगळं काही करण्याची गरज नसते. मुलं त्यांचे खेळ स्वत:च शोधून काढतात. फक्त मुलांना तेवढी मोकळीक दिली पाहिजे. सारखं हे करू नको ते करू नको असं म्हणता कामा नये. त्यांना जे हवं ते करू द्यावं. त्यांच्याशी कँरम, बॉल, बँडमिंटन खेळा. पालक आपल्या लहानपणीचे खेळ देखील त्यांच्याबरोबर खेळू शकतात. लहानपणी त्यांनी केलेला वेडेपणा मुलांना सांगावा. त्यांच्याशी गप्पा मारा.व्यात मुलांना असं वाटलं पाहिजे कीआई-बाबांना आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते आपल्याशी संवाद साधत आहेत. मला वेळ नाही असं ते म्हणत नाहीत.हा विश्वास त्यांना आपोआपच वाटायला लागेल.* पालकांनी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात असं वाटतं?-मुलांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना धमक्या देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना शिक्षा देऊ नका. चला वेळ मिळाला आहे तर मुलांवर तोंडसुख घ्या असं करू नका. इतर मुलांबरोबर त्यांची तुलना करू नका. परस्पर मुलांशी निगडित गोष्टी ठरवून टाका. मुलांना रागावू आणि बोलू नका. त्यांचं विनाकारण सांत्वन देखील करू नका. मुलांना माझं तुज्यावर खूप प्रेम आहे, तुज्यावर विश्वास आहे, तुझं यावर मत काय आहे? आवर्जून विचारा. आज हे असं करूया का? मला मदत करशील का? असं त्यांना महत्व देऊन त्यांच्याशी बोला आणि विश्वास संपादन करा. मुलांशी बोलताना आपली भाषा सुधारा. जर चुकले असाल तर मुलांनाही सॉरी म्हणा.* या काळात मुलांना समजून घेतले नाही तर त्यांना देखील नैराश्य येऊ शकतं का?- नाही, मुलांना असं सहज कधी नैराश्य येत नाही आणि आलं तरी ते लवकर बाहेर पडतात. पालकांना मुलांबरोबर वेळ घालवणं माहितीच नाहीये. ते आपापली काम करीत असतात आणि मुलं एकटेच काहीतरी करत बसतात. यातून मुलांना एकटेपणा जाणवू शकतो किंवा त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढू शकतो. त्यांच्याबरोबर पालकांनी कायम राहावे. त्यांना सत्तत शांत आणि आनंदी ठेवले पाहिजे.* सध्याची मुलं ही मोबाईलच्या आहारी गेली आहेत. त्यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काय करायला हवं?- मुलांचा ह्यस्क्रीन टाइमह्ण निश्चित केला पाहिजे. यामुळे डोळे कसे खराब होतात. हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवा म्हणजे त्यांना मोबाईलचाच विसर पडेल.---------------------------------
मुलांमागे सारखी कुरकुर नको , त्यांना मोकळीक द्या : शोभा भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 12:23 PM
मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी 'खेळां'सारखं दुसरं कोणतेही उत्तम माध्यम नाही..
ठळक मुद्देगरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांच्याशी ' लोकमत' ने संवाद साधला