पुणे : न्यायालयात चारही बाजूंनी काम सुरु आहे. मेट्रोच्या कामामुळे कॅन्टीन पाडल्याने वकील, पक्षकार यांना दुपारच्या वेळेत बसून जेवण करण्यासाठी हक्काची जागाच राहिलेली नाही. नवीन इमारती शेजारील कॅन्टीनला पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने सर्वांचीच गैरसोय झाली आहे. न्यायालयीन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आणि उच्च न्यायालयाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीच दाखल घेतली न गेल्याने अखेर वकिलांनी न्यायालयातच शुक्रवारी एल्गार पुकारला.
न्यायालयातील नवीन इमारतीसमोर जमिनीवर बसून जेवण करीत वकिलांनी निषेध व्यक्त केला. 'वकील एकजुटीचा विजय असो' अशा घोषणांनी न्यायालयीन परिसर दणाणून गेला. जोपर्यंत कॅन्टीनला पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत दररोज नवीन इमारतीसमोरच जमिनीवर बसूनच जेवण करणार असल्याचा निर्धार वकिलांनी केला.
मेट्रोच्या कामामुळे नवीन इमारती शेजारी असलेले कॅन्टीन तातडीने पाडण्यात आले आहे. अजून तिथे प्रत्यक्ष कामाला सुरूवात ही झालेली नाही. तरीही आधीच कॅन्टीन जमीनदोस्त केल्यामुळे वकील आणि पक्षकार यांच्यासमोर बसून जेवण करण्यासाठी जागाच राहिलेली नाही. काही वकिलांना कुठेतरी आडोशाला उभे राहून उभ्यानेच चार घास खाण्याची वेळ येत आहे. न्यायालयात वकील व पक्षकारांसाठी ना कँटीनची ना पार्कींगची सुविधा उपलब्ध आहे. नवीन इमारती उभ्या राहिल्या तरीही वकील आणि पक्षकारांना न्यायालयात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे वकिलांनी सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही अद्याप कँटीनला पर्यायी जागा देण्यात आलेली नाही. त्याचा निषेध म्हणून अखेर वकिलांवरच आंदोलन करण्याची वेळ आली. जवळपास २५ ते ३० वकील बांधव शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवण्याच्या वेळेस नवीन इमारतीसमोर जमिनीवर ठिय्या मारून बसले. जमिनीवर रीतसर मांडी घालून वकिलांनी जेवण केले. या वकिलांना पाठिंबा देण्यासाठी अनेक वकील जमले होते. जोपर्यंत कँटीनला पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत इथेच जमिनीवर बसून जेवण करणार असल्याचे वकिलांनी सांगितले.
पोलीस म्हणतात, आम्हाला पण जेवणासाठी साधे टेबलही नाही
वकिलांचे आंदोलन पाहून एक पोलीस तिथे आले. आम्हालाही जेवण करायला कोणतीच जागा नाही. साधे टेबल देखील मिळत नाही. पण आम्ही तुमच्यासारखा निषेधही व्यक्त करू शकत नसल्याची पोलिसाने व्यक्त केली.