दौंड : पुणे शहरात पाणीकपात करून दौंडला पाणी द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.दौंड तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबरीने शेतीच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चालाला आहे. तेव्हा तालुक्यात पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी माझ्याकडे केली आहे. त्यानुसार सोमवारी (दि. १८) पुणे येथे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेतली. त्यांना तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा दिला. खडकवासला कालव्याला पाणी सोडून ते पाणी खामगाव, माटोबा, वरवंड, शिरर्सुफळ या तलावांत सोडण्यात यावे तसेच यवत, केडगाव, रावणगाव, खडकी स्वामी चिंचोली येथील ओढ्यांना पाणी सोडण्यात यावे जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. यावर जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, की या संदर्भात लवकरच पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ. दरम्यान, या बैठकीत पुण्याच्या पाण्याची कपात करण्याचा निर्णय आपल्या मागणीनुसार झाल्यास त्यानंतर दौंडला पाणी देण्यासाठी कुठलीही अडचण राहणार नाही. माजी आमदार रमेश थोरात यांच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, नितीन दोरगे, उत्तम आटोळे, सनी हंडाळ आदी सहभागी झाले होते.
पुण्यात पाणीकपात करून दौंडला पाणी द्या : थोरात
By admin | Published: April 19, 2016 1:06 AM