जेजुरी : एटीएम कार्ड नूतनीकरण करायचे आहे असे सांगून, त्या कार्डवरील नंबर घेऊन पन्नास हजार रुपये दुसरीकडे ट्रान्सफर करून फसवणूक केल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये सायबर गुन्हा दाखल झाला आहे. कृषी व शिक्षण संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांच्या पत्नी शशिकला कोलते यांची या प्रकरणी फसवणूक झाली आहे. त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.आज दुपारी अचानक तीस हजार रुपये खात्यावरून ट्रान्सफर झाल्याचा एसएमएस आला. त्यानंतर लगेच वीस हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचा फोन आला. आपली फसवून झाल्याचे व पैसे दुसरीकडे ट्रान्सफर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी तातडीने जेजुरीतील एटएममधून खात्यावर असलेली उर्वरित शिल्लक तीस हजार रुपये पटकन काढून घेतली. त्यामुळे तीस हजार रुपये तरी वाचले. दरम्यान, त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तातडीने फिर्याद दाखल केली. जेजुरी पोलिसांनी सायबर गुन्हा अंतर्गत फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी भा.दं.वि.कलम ४२०,६६क व ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले.(वार्ताहर)
एटीएमचा नंबर मिळवून ५० हजारांना फसविले
By admin | Published: April 10, 2017 2:16 AM