लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्याचे वाचन हे केवळ पुस्तकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, इ-बुक च्या माध्यमातून वाचकवर्ग विस्तारलेला आहे. तो नवनवीन चांगल्या गोष्टींच्या शोधात आहे. त्यामुळे यापुढील काळात नवं काय देता येईल? याचा विचार लेखकांनी केला पाहिजे. मल्टीचँनेलमधून वाचनसंस्कृतीच्या बळकटीकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे, असा सूर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून ‘मराठी वाचक काय वाचतात’ या चर्चासत्रात रविवारी उमटला.
पुणे लिटररी फेस्टिव्हलतर्फे आयोजित या चर्चासत्रात विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संपादक मनोहर सोनावणे, ’रहस्य’ कादंबरीचे लेखक गणेश महादेव आणि प्रसिद्ध लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे सहभागी झाले होते. विश्वास
देशपांडे यांनी चर्चासत्रामध्ये मान्यवरांशी संवाद साधला.
गेल्या चार दशकांपासून पुस्तक निर्मिती, लेखन व संपादन क्षेत्रात कार्यरत आहेत. तेव्हापासूनच मराठीत कुणी वाचत नाही असे वारंवार म्हटले जात आहे. तरीही लेखक लेखन करीत आहेत आणि पुस्तकं वाचली जात आहेत. मग खरंच प्रश्न पडतो वाचक वाचत नाहीत का? याचं उत्तर म्हणजे वाचक कमी झालेला नाही तर तो वाढलेला आहे. पण त्या तुलनेत वाचन वाढलेले नाही. वाचकांचे चार प्रकार पाहायला मिळतात. त्यात मंद वाचक (नवखा), गोंधळेला वाचक, भान असलेला वाचक आणि प्रगल्भ वाचक यांचा समावेश आहे. वाचनाचा प्रवास हा मंदापासून प्रगल्भ वाचकांपर्यंत व्हायला हवा. मात्र दुस-या स्तरावरचा जो गोंधळलेला वाचक आहे. त्याची संख्या जास्त आहे. जे मिळेल ते झटपट मिळवण्याच्या तो मागे असतो. गाईड, युजर फ्रेंडली पुस्तकांमध्ये तो अधिक रमतो. त्यामुळे प्रगल्भ वाचक वाढला तरच वाचन वाढले असे म्हणता येईल.
गणेश महादेव यांनी त्यांच्या ’रहस्य’ या कादंबरीने लॉकडाऊन काळात 2000 चा टप्पा पूर्ण केला असल्याचे सांगितले. लेखकांनी नवीन काही दिले तर वाचक नक्की प्रतिसाद देतात. महाराष्ट्राला ऐतिहासिक स्थळांचा वारसा आहे. वाचक इतिहासाशी जोडला जाणे आवश्यक आहे. यासाठी इतिहासातील दंतकथा, पुराणकथा यांची पुनर्मांडणी करणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पालकांनी मुलांना बालवाडमयाची गोडी लावायला हवी. यासाठी पुस्तकांवर चर्चा, नाट्यरूपांतर, स्पर्धा यावर भर द्यायला हवा याकडे डॉ चित्रलेखा पुरंदरे यांनी लक्ष वेधले.
------------------------