पुणे : हॉटेलचे बिल देण्यावरून वाद घालून बॉटलने वार केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये फिर्यादी गंभीररीत्या जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत भैरवनाथ बाबुराव साळुंखे (वय - ३६, रा. मुंढवा रोड) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसोबत मुंढवा रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी तेथे आरोपी मंगेश तांबे, अक्षय गागडे, गोट्या (पूर्ण नाव माहित नाही) हे वेगळ्या टेबलवर जेवण करत होते. जेवण झाल्यावर तिघा आरोपी आणि फिर्यादींमध्ये बिल देण्यावरून वाद झाला.
आरोपी शिवीगाळ करत असल्याने आजूबाजूला महिला आहेत शिवीगाळ करू नको असे फिर्यादींनी सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी रिकामी बिअरची बॉटल फोडून फिर्यादींवर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये फिर्यादींना गंभीर इजा झाली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मनोहर हे पुढील तपास करत आहेत.