पुणे : जिल्ह्यातील खासदारांनी संसदग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेली गावे, हायटेक होणार असून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरच्या ज्ञानाचे आदानप्रदान करता येणार आहे! या दत्तक गावांमध्ये ‘ग्लोबल क्लासरूम’ तयार करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना जगातील ज्ञानाची कवाडे खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी गावांचे संगणकीकरणाच्या अनुषंगाने सर्वेक्षणास सुरुवात झाली असून, शिरूर तालुक्यातील जांबूत येथे पहिले ग्लोबल क्लासरूम उभारण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे युवा तंत्रज्ञ संतोष तळघट्टी यांच्याकडे संसदग्राम योजनेतील दत्तक गावांना तंत्रज्ञानाने ‘हायटेक’ करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तळघट्टी यांची नुकतीच बैठक झाली आहे. तळघट्टी यांनी राबविलेल्या ग्लोबल क्लासरूम संकल्पनेविषयी बैठकीत सादरीकरण केले. यानंतर बैठकीत आठही गावांतील वस्तूस्थितीची पाहणी करून तांत्रिक बाबी व अडीअडचणींचा सविस्तर प्रस्ताव तळघट्टी यांना सादर करणार आहेत. तळघट्टी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये विविध गावांतील शाळा ग्लोबल क्लासरूमच्या माध्यमातून विकसित केल्या आहेत. तसेच सरकारी शाळांमधील कमी होत चाललेल्या विद्यार्थी संख्या वाढीसाठी याचा लाभ झाल्याचे दिसून आले आहे. याच धर्तीवर ही ग्लोबल क्लासरूम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जगाशी जोडण्याचे काम केले जाणार आहे.शाळांमध्ये उपलब्ध सोई-सुविधांमध्ये भर घालून शाळांमध्ये ‘ग्लोबल क्लासरूम’ उभारली जाणार आहे. यामध्ये खासदारांनी दत्तक घेतलेले शिरूर तालुक्यातील करंदी, हवेलीतील वडगाव शिंदे, जुन्नर येथील टिकेकरवाडी, दौंड येथील दापोडी, मावळ येथील सदुंब्रे, बारामती येथील मुर्टी, शिरूर येथील जांबूत, पुरंदर येथील गुंळंूचेमध्ये या गावाचा समावेश आहे.स्मार्ट, मॉडर्न अशा नवीन शाळा सुरू करण्याऐवजी आहेत त्याच शाळांचे स्वरूप बदलले. त्यांनाच नवीन झळाळी देण्याची ही संकल्पना. विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरून शाळांमध्येच सगळ्या जगभरातील तज्ज्ञांना विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी पाचारण करत ही अनोखी कल्पना ‘ग्लोबल क्लासरूम’च्या नावाने प्रत्यक्षात आली. आजच्या शिक्षकांना केवळ पुस्तकेच नव्हे तर प्रयोगशील माणसांचीही गरज आहे. जागतिक दर्जाचा आशय विद्यार्थ्यांना देणे व त्यासाठी फोरम उपलब्ध करून देण्याचे काम हे ग्लोबल क्लासरूम करत आहे.
जांबूतला ग्लोबल क्लासरूम!
By admin | Published: January 23, 2016 2:34 AM