विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडी सेंटरच्या वतीने दि. ११, १२, १३ व १४ जानेवारी २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. संमेलनात सर्वंकश चर्चा घडून यावी अशी अपेक्षा डॉ. खरे यांनी व्यक्त केली.विजय खरे म्हणाले, सम्यक साहित्य संमेलनाच्या नावात थोडासा बदल करून त्याचे नाव या वर्षीपासून अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन असे करण्यात आले आहे. सर्वांना सामावून घेणारे सर्वसमावेशक असे हे संमेलन असणार आहे.अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनामध्ये साहित्याची सर्वंकष चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. इतर कुठल्याही संमेलनाशी याची स्पर्धा नाही. समकालीन विषयांना भिडण्याचा प्रयत्न या संमेलनात करण्यात आला आहे.महाराष्टÑाच्या मराठी साहित्य-संस्कृती पर्यावरणात तसेच इतर राज्यांच्या भाषिक आणि साहित्य व्यवहारात सम्यक साहित्य संमेलनाने वेगळा ठसा उमटविलेला आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ५ सम्यक साहित्य संमेलनांना भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आगामी संमेलनास त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून परशुराम वाडेकर हे जबाबदारी पार पाडीत आहेत.डॉ. यशवंत मनोहर यांचे नाव साहित्य क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांचे उत्थानगुंफा, काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता आदी कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.यशवंत मनोहर यांनी वैचारिक साहित्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. डॉ. आंबेडकरांचा बुद्धधम्म, मंडल आयोग, आपले महाकाव्यातील नायक, रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर संस्कृती, बुद्धाचे तत्त्वज्ञान, आचारधर्म आदी विषयांवर त्यांनी वैचारिक लेखन केले आहे.समीक्षेच्या क्षेत्रातही डॉ. मनोहर यांचे मोठे योगदान राहिले आहे. आंबेडकरी चळवळ आणि साहित्य, समाज आणि साहित्य समीक्षा, आंबेडकरवादी महागीतकार, दलित साहित्य आदी विषयांवर त्यांनी समीक्षात्मक लिखाण केले आहे.सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशाच्या विविध राज्यांतील, विविध भाषक साहित्यिक, कलावंत, नाट्यकर्मींना निमंत्रित करण्यात आले आहे. साहित्यविषयक विविध प्रकारचे उपक्रम या संमेलनात पार पाडले जाणार आहेत.बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलन स्थळाला ‘संविधाननगरी’ असे संबोधण्यात येणार आहे.संमेलनाच्या पूर्वसंध्येला ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजीनगरच्या एसएसपीएमएस शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देऊन भिडे वाड्यापर्यंत ‘संविधान मिरवणूक’ काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सर्व निमंत्रित साहित्यिक, कलावंत व नाट्यकर्मी सहभागी होणार आहेत. ही संविधान सन्मान रॅली संमेलनाचे आकर्षण असणार आहे.संमेलनाचे उद्घाटन १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी होणार आहे. पद्मश्री के. इनोक यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे त्यांचे अध्यक्षीय विचार मांडतील. स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आपले विचार मांडतील.उद्घाटन सत्रात अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.शरणकुमार लिंबाळे, योगीराज वाघमारे, सदानंद देशमुख, नजुबाई गावित, फ. मुं. शिंदे, सुरेंद्र जोंधळे, राजन खान, जयदेव डोळे, राजनखान आदी मान्यवर लेखक, साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी या संमेलनाच्या निमित्ताने मिळणार आहे.
संमेलनात साहित्याची सर्वंकष चर्चा - विजय खरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:50 AM