प्रकाश गायकर पिंपरी : माणसाचे आयुष्य ग्लोबल होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाच कुणासाठी वेळ नाही. सोशल मीडियाच्या माध्यामातून जग जवळ येत आहे. मात्र येथे आई-बापाला मुलासाठी वेळ नाही, मुलाला आई-बापासाठी वेळ नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. माणूस स्वत:च्या जगामध्ये इतका हरवला आहे की, ज्या आई-बापाने हे जग दाखवले त्याच आई-वडिलांना रस्त्याच्या बाजूला सोडले जात आहे. ज्या बहिणीने हातावर राखी बांधून संरक्षणाचे वचन घेतले. त्या बहिणीला रुग्णालयात मरण्यासाठी सोडून भाऊ घरची वाट धरत आहे.
पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये रोज अशा बेवारस रुग्णांना दाखल केले जाते. ज्यांना आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी आहे. मात्र त्या रुग्णाला सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. काहींची तर आर्थिक परिस्थिती नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये वायसीएममध्ये तब्बल ३१३ बेवारस रुग्णांंची नोंद आहे. तर मागील तीन महिन्यांमध्ये त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, अवघ्या तीन महिन्यांमध्ये तब्बल ९६ बेवारस रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट या दिवशी दुपारी १०८ रुग्णवाहिकेने रत्नाबाई गायकवाड (वय ६०) या महिलेला वायसीएम रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या महिलेला डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र उपचार सुरू असतानाच भाऊ रुग्णालयातून निघून गेला. दोन तासांपूर्वी भावाने बहिणीला वाचविण्यासाठी दाखल केले. मात्र भाऊच गायब झाल्याने डॉक्टरही चक्रावून गेले.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भाऊ रुग्णालयातून निवांत जाताना दिसून आले. त्यानंतर दहा दिवसांनी आपला शोध सुरू असल्याची कुणकुण या भावाला लागली आणि तो बहिणीला पाहण्यासाठी रुग्णालयात पुन्हा हजर झाला. अनेक घटनांमध्ये स्वत:चे घरचेच सोडून गेल्याचे निदर्शनास आले आहे. व्यक्ती आजारी किंवा वयस्कर असेल तर ती व्यक्ती घरात नसलेली ठीक आहे, अशी मानसिकता होत आहे. त्यासाठी अशा रुग्णांना रक्ताचीच नाती सोडून जात आहेत.संस्थेच्या माध्यमातून जे काम केले जात आहे, ते कौतुकास्पद आहे. जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिलेल्या बेवारस रुग्णांची सेवा केली जाते. नातेवाईक सोडून जात असल्याने एका रुग्णाला तीन, चार महिने रुग्णालयातच ठेवावे लागते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरही ताण येतो. ज्या रुग्णांना नातेवाईक सोडून जातात, ते आजारी असतातच असे नाही. तर त्यांना आधाराची व आश्रयाची आवश्यकता असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्यानेही काही जण सोडून जातात. - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.तिला कोणच नाही. माझ्या घरची माणसे चांगली वागत नाहीत. कुठल्यातरी सरकारी दवाखान्यात तिचा शेवट होईल हा हेतू होता. - रुग्णाचे एक नातेवाईकरिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेचा आधारवायसीएममध्ये अनेक बेवारस रुग्णांना दाखल केले जाते. त्यांना रिअल लाइफ रिअल पीपल ही संस्था मदत करते. त्यांना जेवण व त्यांची देखभाल केली जाते. रुग्णांच्या नातेवाइकांना शोधून त्यांना घरी पोहोचवणे, आश्रमात पाठवणे याची जबाबदारी संस्था घेते. तसेच उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर संस्थेमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. आतापर्यंत १०४ मृतदेहांवर संस्थेमार्फत अंत्यसंस्कार केले आहेत. यामध्ये संस्थेचे संस्थापक एम. ए. हुसैन, सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, आकाश शिरसाठ, मिलिंद माळी, दत्ता वाघमारे, कमल कांबळे, उल्हास चांगण, रेणुका शिंदे हे काम करतात.मी रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेच्या माध्यमातून वायसीएममध्ये २०१० पासून सेवा करत आहे. लोक कर्तव्य विसरले आहेत. शेकडो बेवारस रुग्ण दरवर्षी दाखल होतात. त्यापैकी अनेकांना स्वत:च्या घरच्यांनी सोडून दिलेले असते. अशा रुग्णांवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा आधार घेऊन उपचार केले जातात. त्यांना त्यांच्या घरी किंवा आश्रमामध्ये सोडले जाते. - एम. ए. हुसैन, संस्थापक रिअल लाइफ रिअल पीपल.