पुणे : विधायक पत्रकारितेचा वसा जपताना समाजातील मांगल्याला, सेवाभावाला वृद्धिंगत करण्यासाठी संघर्षमय आयुष्यातून उत्तुंग कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा ‘लोकमत वुमेन समीट’मध्ये गौरव होणार आहे. आदिवासी पाड्यांवरील मुलांना शिक्षणाची गोडी लावणाºया, बचतगटाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना सक्षम करणाºया ठमाताई पवार यांना ‘मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव’ पुरस्कारदेऊन गौरविण्यात येणार आहे.
दोघी, देवराई, अस्तु आणि कासव यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक अशा तिहेरी भूमिकांद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या सुमित्रा भावे यांना ‘सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केली.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ असणाऱ्यांचा गौरव ‘लोकमत’च्या वतीने करण्यात येणार आहे. दर्डा म्हणाले, ‘‘लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांनी मूल्ये आणि तत्त्वांचा जागर करीत समाजहितैषी परिवर्तनाच्या भूमिकेचा पुरस्कार केला आहे. याच भूमिकेतून हा पुरस्कार वितरण सोहळाहोणार आहे.’’ ‘लोकमत’च्या वतीने राज्यपातळीवर ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कारांचे वितरणही या वेळी होणार आहे.
यंदाच्या वर्षीचे पुरस्कारार्थी असे :शैक्षणिक - डॉ. भारती पाटील (कोल्हापूर), सांस्कृतिक - धनश्री खरवंडीकर (अहमदनगर), सामाजिक - सृष्टी सोनवणे (बीड), आरोग्य - डॉ. संजीवनी केळकर (सोलापूर), व्यावसायिक - सुप्रिया बडवे (औरंगाबाद),शौर्य - रूपाली मेश्राम (भंडारा), क्रीडा - जेमिमा रॉड्रिग्ज (मुंबई).