पुणे: गदिमांनी प्रेमगीते, अभंग, ओव्या, अंगाई, राष्ट्रभक्तीचे पोवाडे अशा सर्व प्रकारच्या रचनांना शब्दबध्द केले. मात्र, यासगळ्या त्यांच्या साहित्याची दखल तथाकथित जाणकारांनी कवी म्हणून घेतली नाही. तसेच त्यांना कवी न म्हणता गीतकार हाच किताब बहाल केल्याची खंत ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी व्यक्त केली. गदिमा प्रतिष्ठानतर्फे ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते सई परांजपे यांना गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना चैत्रबन पुरस्कार, अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर यांना विद्या प्राज्ञ पुरस्कार आणि ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात पुरस्कारांबरोबरच डॉ. विनया बापट लिखित 'शॉर्ट स्टोरी आॅफ लेट जी. डी. माडगूळकर' पुस्तकाचे प्रकाशनही डॉ. ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर आणि कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर व्यासपीठावर होते.पुरस्काराला उत्तर देताना परांजपे म्हणाल्या, गदिमांची भाषा अस्सल आहे. त्यात कुठलीही भेसळ नाही. आकाशवाणीत निवेदक म्हणून काम करत असताना बा.भ. बोरकर, गोपीनाथ तळवळकर ,गदिमा अशा दिग्गजांना जवळून पाहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याचे अनेक प्रसंग आले. मात्र, गदिमा यांचे व्यक्तिमत्व खूप महान होते. याचा संकोच बाळगुन त्यांच्याजवळ जाऊन बोलण्याचे कधी धाडसच झाले नाही. आता या गोष्टीचा राग येत आहे.आता गदिमा स्मृती पुरस्काराच्या निमित्ताने तो योग आला असून ती शाबासकी मिळत आहे. ....................* गदिमांना भाषांची सुंदर वळणे उमगली....सहज संवाद बोलावेत अशी गदिमांची लेखनाची शैली कथा, गीतांमध्ये दिसून येते. औपचारिक शिक्षणाशी संबंध नसताना संस्कारक्षम शैलीमुळे ते चमत्कारिक वाटतात. गदिमांवर गीतरामायण, संतांचे, ओवीचे,भुपाळी, वाघ्यामुरळीचे, पोवाड्यांचे, जुन्या गाण्यांचे संस्कार होते. त्यामुळे भाषांचे अनेक सुंदर वळणे त्यांना उमगली. असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या.
जाणकारांनी गदिमांना कवीची नव्हे तर गीतकाराचीच पदवी केली बहाल : सई परांजपे यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:40 PM
गदिमांच्या साहित्याची दखल तथाकथित जाणकारांनी कवी म्हणून घेतली नाही.
ठळक मुद्देगदिमा पुरस्कार सोहळा कार्यक्रमात डॉ. विनया बापट लिखित 'शॉर्ट स्टोरी आॅफ लेट जी. डी. माडगूळकर' पुस्तक प्रकाशन