सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामातील एफआरपी रक्कम व्याजासह न दिल्यास कारखान्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे.सतीश काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना गेल्या तीन महिन्यांपासून सुरळीत सुरू आहे. कारखान्याने ५,३५,००० मे.टन उसाचे गाळप केलेले असून सरासरी रिकव्हरी ११.७० आहे. शेतकरी सभासदांचा ऊस गाळपास गेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना सोमेश्वरने अद्याप सभासदांना ही रक्कम पूर्णपणे अदा केलेली नाही. याबाबत शेतकरी कृती समितीने कारखान्याला तीन वेळा एफआरपी देण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, कारखान्याने यावर कोणतीही कारवाई केली नाही. दुसरीकडे मात्र वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून चालू वर्षीची एफआरपी एकरकमी देणार असल्याचे चेअरमन यांनी वारंवार जाहीर केलेले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाला केवळ राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडून बिनव्याजी एफआरपी कर्ज किंवा वाढीव वित्त साह्य योजनेतून बिनव्याजी कर्ज घेण्याचे आयोजन असून विनाकारण गरज नसताना राज्य सरकारच्या धोरणांचा फायदा घेण्याचे आपले धोरण असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. संचालक मंडळ कारखान्याच्या सभासदांचे नुकसान करून त्यांना वेठीला धरत असून त्यांचे हे धोरण चुकीचे असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.सभासदांना चालू वर्षाची एफआरपी देण्यासाठी कारखान्याने मागील वर्षी किमत चढ-उतार निधी स्वरूपात २० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे; परंतु या निधीचा संचालक मंडळाने दुरुपयोग केला असल्याचा आरोप सतीश काकडे यांनी केला आहे. तसेच, कारखान्याच्या संचालक मंडळाने एफआरपी व्याजासह देणे कमप्राप्त असताना सभासदांची दिशाभूल करून कारखान्याने कोट्यवधी रुपयांच्या कामांचे साखर आयुक्त कार्यालयाची मंजुरी घ्यावी लागू नये म्हणून छोटे छोटे अंदाजपत्रक तयार करीत असून खूप मोठा अनावश्यक खर्च करत असल्याचा आरोपही काकडे यांनी केला आहे.
एफआरपीसाठी न्यायालयात जाणार; शेतकरी कृती समितीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 2:35 AM