मंचर : पुणे-नाशिक महामार्ग प्रस्तावित बाह्यवळण रस्त्याला विरोध करून न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय आज झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत बाह्यवळण रस्ता होऊच देणार नाही, असा निर्धार करण्यात आला. शेतकरी हरकती नोंदविणार आहेत. बाह्यवळण रस्त्याच्या संदर्भात राजपत्र प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. यापुढील काळातील दिशा ठरविण्यासाठी पेठ-अवसरी घाटाजवळ असलेल्या गोरक्षनाथ मंदिराजवळ रविवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. या वेळी शेतकरी बचाव कृती समितीचे निमंत्रक प्रभाकर बांगर, डॉ. सुहास कहडणे, सुदाम काळे, विलास दातोरे, पंढरीनाथ भालेराव, दिलीप बाणखेले, ज्ञानेश्वर भोर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन तास शेतकऱ्यांनी या विषयावर चर्चा केली व भूमिका मांडली. पुणे-नाशिक महामार्ग रस्त्याचे आहे तेथेच रुंदीकरण करावे, बाह्यवळण रस्ता करु नये, अशी ठाम मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांचा विरोध डावलून बाह्यवळण रस्ता होणार असेल तर न्यायालयात धाव घेण्याचे ठरविण्यात आले. कुठल्याही परिस्थितीत बाह्यवळण रस्ता होऊ द्यायचा नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्यासाठी हरकती नोंदविल्या जाणार आहेत. (वार्ताहर)
न्यायालयात जाणार
By admin | Published: November 24, 2014 12:58 AM