पुणे: गो फर्स्ट एअरलाइन्सने कोणतीही पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद केली. पुढे ही सेवा चालू राहील की नाही याबद्दल कोणतेही शाश्वती नाही. उन्हाळी सुट्यांच्या धर्तीवर सामान्य नागरिक पर्यटनाच्या निमित्ताने काही महिन्यांआधीच नियोजन करतात. गो फर्स्ट एअरलाइन्सने सर्व पर्यटकांना अचानक धक्का दिल्याने पर्यटकांसह पर्यटन कंपन्यांची (टूर्स अँड ट्रॅव्हल्स) प्रचंड तारांबळ उडाली आहे. अशा अचानक उद्भवलेल्या संकटामुळे चूक नसतानाही पर्यटन संस्थांना पर्यटकांच्या रोषाला व कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती 'टॅप'चे (ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे) अध्यक्ष दीपक पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गो फर्स्ट एअरलाइन्सने विमान सेवा बंद केल्यामुळे जे पर्यटक काश्मीर, लेह या भागात अडकले आहेत. त्यांना १० हजार रुपये किमतीच्या तिकिटाचे ३० हजारापर्यंत जास्तीचे पैसे देऊन परतीचे तिकीट घ्यावे लागत आहे. या परिस्थितीचा फायदा इतर विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या घेत आहेत. पुणे ते दुबई या प्रवासासाठी २० हजार एवढा दर आहे. तर पुणे ते दिल्ली प्रवासासाठी २५ ते ३० हजार मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत पर्यटकांची होणारी लूट थांबवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत जीवन हेंद्रे यांनी व्यक्त केले.
यापूर्वी किंगफिशर एअरलाइन्स, जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांनी ऐन पर्यटनाच्या हंगामात याच प्रकारे, सर्वांना अडचणीत आणले होते. आजपर्यंत ग्राहकांचे व पर्यटन कंपन्यांचा या विमान कंपन्यांनी एकही रुपया परत दिलेला नाही, असे किती दिवस चालणार, यांच्यावर कधी कारवाई होणार? हे होऊ नये म्हणून कधी उपाययोजना होणार का ? कारण दिवाळखोरी जाहीर करणे ही एक दिवसात होणारी बाब नक्कीच नाही, या सर्व गोष्टींची कल्पना असतानाही, यावर कारवाई न करता डोळेझाक करणे हे चुकीचे आहे अशी भावना टॅपच्या सदस्यांनी व्यक्त केली.
ग्राहकांची फसवणूक तर होत नाहीये ना..
गो फर्स्ट कंपनीच्या म्हणण्यानुसार कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. असे असून देखील कंपनी पुढील काळातील बुकिंग का घेत आहे ? हा प्रश्न उपस्थित राहतो. यावरून असे लक्षात येते की, ही ग्राहकांची फसवणूक आहे. कायद्याच्या पळवाटा शोधून करण्यात आलेला फ्रॉड आहे असे मत नीलेश भन्साळी यांनी व्यक्त केले.
पर्यटकांची दिशाभूल..
विमान कंपन्यांकडून पर्यटकांची दिशाभूल केली जाते. त्यांना सांगितले जाते की आम्ही तुमच्या तिकिटाचे पैसे रिफंड केले आहेत, पण ते पैसे त्यांच्याच आभासी अकाउंट मध्ये दिले जातात. ते पैसे कधीही बँकेत येत नाहीत, ते फक्त आणि फक्त त्याच विमान कंपन्यांची तिकीटे बुक करण्यासाठी वापरता येऊ शकतात. जर एअरलाईन कंपनीच बंद पडली, तर या आभासी अकाउंट मधील रिफंड कुठे वापरायचा यासाठी डीजीसीएने मार्गदर्शन करावे, अशी मागणी टॅपच्या वतीने करण्यात आली आहे.