पुणे: समाजाच्या प्रत्येक घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध असून अधिकारी वर्गाने जास्तीत जास्त योजनांचा लाभ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी गावांना भेटी देणे गरजे आहे,असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी व्यक्त केले.
तागडे यांनी शनिवारी समाज कल्याण आयुक्तालयात भेट देऊन त्यांनी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.यावेळी तागडे बोलत होते. सामाजिक न्याय विभागाच्या योजना राबविताना शिक्षणाला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न करावेत,तसेच वसतिगृहांचे प्रश्न सोडवावेत.
शासनाने दिलेल्या सोयीसुविधांचा पूर्ण लाभ विद्यार्थ्यांना करून द्या, गरजू लोकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामीण भागात भेटी देऊन राबविलेल्या योजनांचा आढावा घ्यावा. सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांमध्ये सी बी एस सी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करावा,असेही तागडे यांनी यावेळी अधिका-यांना सुचित केले.