जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत येत्या रविवारी येणाऱ्या बकरी ईदला बकऱ्याचा बळी न देण्याचा निर्णय येथील मुस्लिम समाजबांधवांनी घेतला आहे. त्याबद्दलचे लेखी पत्रही त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांना दिले आहे.
येत्या रविवारी हिंदूंचा आषाढी एकादशी सण आहे. त्याचबरोबर याच दिवशी बकरी ईद हा मुस्लिम सणही येत आहे. एकीकडे हिंदू बांधव आषाढी एकादशीला पवित्र मानतात, तर बकरी ईद हाही मुस्लिमांचा पवित्र सण मानला जातो. मात्र, हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने सामाजिक ऐक्य आणि मानवता, हिंदू-मुस्लिम ऐक्य याचा विचार करून जेजुरी शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी सण उत्साहात साजरा करावयाचा.
मात्र, बकऱ्याचा बळी या दिवशी द्यायचा नाही, बकरीचा बळी दुसऱ्या दिवशी सोमवारी देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी समाजबांधवांच्या या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे.