जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवनक्षेत्र आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नेहमीच बिबट्याच्या दहशतीखाली असलेला उंब्रज, काळवाडी, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी या परिसरात कायमच बिबट्यांचे हल्ले होत असतात. अशाच हल्ल्यात गुरुवार दि.११ रोजी पहाटे चारच्या सुमारास सुनील दगडू कुटे यांच्या शेतातील मेंढपाळाने आपला वाडा बसविला होता. तेथेच बिबट्याने हल्ला करून मेंढी ठार केली. त्यामध्ये मेंढपाळाचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर वनखात्याचे कर्मचारी व अधिकारी एस. के. साळुंके, इ. पी. विभुते, बी. के. खर्गे, सुरेश गायकर, यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी खिल्लारी यांनी पोस्टमार्टम केले.
यापरिसरात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे त्यांचे अपघाती मृत्यूही होत आहेत. त्यामुळे बिबट्यांचे वारंवार अपघाती मृत्यू व त्यांचे होणारे हल्ले यावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची मागणी परिसरातली जनसामान्य नागरिकांकडून होत आहे.
--
फोटो क्रमांक : ११ पिंपरी पेंढार बिबट्या ठार
फोटो ओळी : पिंपरी पेंढार (खारावने) ता. जुन्नर येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार झाली.