आंबेगाव तालुक्यातील वाढता बिबट्यांचा प्रादुर्भाव पाहता दररोज एक ते दोन ठिकाणी बिबट्यांचे हल्ले होत आहेत. वनखाते बिबट्याला पकडण्यात असमर्थ असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील चास, नारोडी, महाळुंगे पडवळ, कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक, चांडोली खुर्द, वळती, भराडी, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, जारकरवाडी, मंचरचा काही भाग, पोंदेवाडी, जवळे, धामणी, पहाडदरा व अन्य काही गावांमध्ये बिबट्याने नेहमीच आपले अस्तित्व दाखवले आहे. चास, नारोडी, लौकी या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना दिवसाही होत असते. मागील दोन वर्षांपासून शेतकरीराजा अतिवृष्टी, कोरोना त्याचबरोबर नेहमीच शेतीमालाचा बाजारभाव पडत चालला आहे. त्याचबरोबर दररोज कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याच्या पशुधनावर बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने बिबट्याच्या हल्ल्यापासून पशुधन वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.
लाखनगाव येथील शेतकरी आलमगीर अजमुद्दिन मुजावर यांचा पोंदेमळा येथे सुमारे शंभर शेळ्यांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये वेगवेगळे विभाग केले आहे. त्यापैकी एका विभागातील सहा शेळ्या आज पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ठार झाल्या आहेत. वनरक्षक सोपान अनासुने व अशोक जाधव यांनी पंचनामा केला असून,वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या सूचनेनुसार तत्काळ या ठिकाणी पिंजरा बसविण्यात येणार आहे.