गराडे : लोकदेव श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथील भक्त तुळाजीबुवा मंदिरापासून श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील विवाह सोहळ्यासाठी आज माघ शु. चतुर्दशी मंगळवारी (दि. ३०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाही दिमाखात प्रस्थान झाले.श्रीक्षेत्र कोडीत येथे सोमवारी उत्सवमूर्तींना अभिषेक घालण्यात आला. ढोल ताशांच्या व पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाच्या काठीसह छत्री, अब्दागिरी, चवºया ढाळत देउळवाड्यातून जवळ असणाºया श्रीनाथ म्हस्कोबामहाराजांचे परमभक्त असलेल्या तुळाजी मंदिरात पालखी विसावली.पालखीसह सर्व लवाजमा विसावल्यावर उपस्थित श्रीनाथभक्तांनी ‘सवाई सर्जाचं चांगभलं’चा जयघोष केला.यामुळे संपूर्ण कोडीतनगरी दुमदुमून गेली. या नंतर वीर येथील १० दिवसांच्या यात्रेसंबंधी नियोजनाची बैठक झाली. या वेळी कोडीत ग्रामस्थ सालकरी, मानकरी श्रीदेवनाथ म्हस्कोबा महाराज ट्रस्टचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, तुळाजीबुवा मंदिरात पारंपरिक ओव्यांचा व एकतारी भजनाचा कार्यक्रम झाला.मंगळवारी (दि. ३०) पहाटे ५ वाजता तुळाजीबुवा मंदिरात उत्सव मूर्तींना महारुद्राभिषेक घालून उत्सव मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी उत्सवमूर्तींचे दर्शन घेतले. दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेऊन हजारो भाविक अनवाणी वीरकडे पारंपरिक वाटेने निघाले.प्रथम मूळ आले कोडीतला....तयारी सांगितली लोकाला... उद्या पुनवचं निघुन चला... झाली तयारी... या महाराजांची बाहेर निघाली जरतारी... हे ढोल ढमामा वाजू लागल्या बेहरी... दोन्ही बाजूला दोन छत्रा न् अब्दागिरी... देव बसले पालखी मधे डडती चोरी ढळली... काणू कर्ण वाजु लागले नाद हंबीरी... असा माही म्होरं ताफा आहेर निघाला... आज महाराज नवरे झाले चला लग्नाला... देव निघाले लग्नाला... अशा पारंपरिक ओव्या गायल्या जात होत्या.दुपारी १२ वाजण्याच्या अगोदर सर्वांची लगबग सुरु झाली. पालखीजवळ मानकरी सालकरी अब्दागिरी छत्र निशाण घेऊन उभे होते. दु. १२.४५ वाजता तुतारी, शिंगे वाजली व मानकºयांनी श्रीनाथ म्हसकोबामहाराजांच्या पालखीला खांदा लावला.ढोलताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा गजर, सालकरी, मानकरी, ग्रामस्थ व हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीनाथांच्या पालखीचे वीरकडे शाही प्रस्थान सुरु झाले. या पालखीपुढे मानाची काठी, पालखीसमवेत दागदागिनदार, अब्दागिरी चवºया ढाळत हजारो भाविकांच्या उपस्थितीत अक्षता झेलीत धीम्यागतीने पालखीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. पालखी नदी पलीकडे गेल्यावर नागदरी या ठिकाणी पारंपरिक मेंढ्यांचे रिंगण वाद्याच्या गजरात पार पडले.पिंपळे ते वीर अशा पालखीमार्गावर पुणे येथील जयश्री आर्टच्या कलावंतांनी रांगोळ्या काढल्या होत्या.श्रीनाथ म्हस्कोबामहाराजांची पालखी भिवडी, सुपे, पिंपळे, पांगारे घाट मार्गे परिंचे गावारून पालखी राऊतवाडी येथे विसावेल. सायंकाळी पालखी वीर येथे पोहोचल्यानंतर सर्व मानकरी स्वागत करतात. रात्री १२ वाजता श्रीनाथ म्हस्कोबामहाराज व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाहसोहळा होतो.आजपासून वीर येथील १० दिवसांच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. श्रीनाथ म्हस्कोबा हे जागृत देवस्थान आहे. म्हस्कोबामहाराज मनोकामना पूर्ण करणारा देव म्हणून हजारो भाविकांना प्रचिती आली आहे. त्यामुळे वीर यात्रेला दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढतच आहे.पालखी प्रस्थान सोहळ्याचे नियोजन श्री देवनाथ म्हस्कोबा महाराज ट्रस्ट कोडीत, श्री तुळाजीबुवा मंडळ कोडीत व कोडीतकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
देव निघाले लग्नाला, ‘सवाई सर्जाचं चांगभलं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 2:45 AM