पुणे : राना-वनात पाखरांसाठी ना दाण्याची सुविधा ना पाण्याची सोय. अशावेळी या अबोल पाखरांच्या पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी शिळेश्वर येथील मारुती किसण मेंगडे या शेतकऱ्याने चक्क आपले एक एकरातील ज्वारीच्या उभ्या पिकांसह असलेले शेत खुले केले आहे. तसेत शेतात खड्डा करुन वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.
माणसाला अन्न पाणी हवे असल्यास कुठुनतरी व्यवस्था लावुन करु शकतो परंतु राना-वनात निसर्गाचा एक घटक असलेल्या पाखरांच्या अन्न-पाण्याची सोय कोण करणार? शहरी भागात अलीकडच्या काळात काही लोक पाखरांसाठी पाण्याची सोय करतात. मात्र रानातल्या पाखरांची कोण काळजी घेणार? त्यांच्या दाण्या-पाण्याचे काय? असा प्रश्न मेंगडे यांना गेले अनेक दिवस सतावत होता. यातूनच त्यांनी आपले शाळूचे उभे पीक असलेले शेतच या पाखरांसाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याबरोबरच शेतातच पाण्याचीही सोय केली आहे.
रोज पहाटे सूर्योदयाअगोदर पाखरांचे थवेच्या थवे उभ्या पिकावर तुटून पडत असतात. सकाळी नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत रानात किलबिल सुरू असते. दरम्यान, या अन्नधान्याबरोबर पिण्यासाठी लागणारे पाणीही उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचीही सोय झाली आहे. हा आदर्श सर्वांनी घ्यायची गरज आहे.