बाळासाहेब काळे ल्ल जेजुरीतीर्थक्षेत्र जेजुरीत अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा निवास करत असून, राज्यभरातून दररोज हजारो भाविक देवदर्शनासाठी येत असतात. कुलदैवताच्या या नगरीत भाविकांची मात्र गडाच्या पहिल्या पायरीपासून ते अगदी मुख्य गाभाऱ्यात दर्शन घेईपर्यंत लूट होत आहे. लुटारूंच्या विळख्यात गरिबांचा देव सापडला असून, पंढरपूरचा विठोबा जसा सर्वांसाठी मुक्त झाला, तसाच जेजुरीचा खंडेरायाही अवघ्या बहुजनांसाठी मुक्त व्हावा, अशा भावना भाविक व्यक्त करीत आहेत. असंख्य तक्रारी देवसंस्थानच्या तक्रार पुस्तिकेत येऊनही त्याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. ‘लोकमत’ने तक्रार पुस्तिकेतील तक्रारदार भाविकांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या लोकांपासून देव मुक्त करण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली कुलदैवत खंडोबाच्या मंदिरासाठी श्री मार्तंड देवसंस्थान या न्यासाची निर्मिती करण्यात आली असून, तसे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसुविधा, व्यवस्थापन, गड मंदिर देखभाल दुरुस्ती करणे आदी जबाबदारी या न्यासाकडे आहेत. मात्र, खंडोबाच्या देवदर्शनासाठी, धार्मिक विधी, कुलधर्म कुलाचार आदी कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण होऊ लागले आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. कुलदैवत आता सर्वसामान्यांचा देव राहिला नसून, मोठा खर्च दानधर्म करणारांचा होत असल्याच्या मार्मिक तक्रारीही भाविकांकडून येत आहेत. मनासारखी दक्षिणा, दानधर्म करणाऱ्या भाविकांना येथे चांगली वागणूक मिळते, तर गोरगरिबांना मात्र तुसडेपणाची वागणूक, प्रसंगी अपशब्दही ऐकून घ्यावे लागत आहेत.देवसंस्थानकडे व्यवस्थापनासाठी ४५ कर्मचारी आहेत, त्यांच्यासमोर अशा प्रकारची दक्षिणा सक्ती होत आहे. भाविकांनी लुटीच्या दक्षिणासक्तीच्या तसेच गैरवर्तनाच्या अनेक तक्रारी देवसंस्थानच्या तक्रारपुस्तिकेत असूनही विश्वस्त मंडळाकडून दुर्लक्षच होत आहे. मुळातच विश्वस्त मंडळात एकवाक्यता नसल्याने भाविकांच्या तक्रारींना ते न्याय देऊच शकत नाहीत. विशेष म्हणजे तक्रारदार भाविक आपली तक्रार लिहिताना स्वत:च्या नावागावासह संपर्कासाठी फोन नंबर देऊनही विश्वस्तांकडून त्यांची साधी विचारपूसही होत नाही. केवळ तक्रारपुस्तिकेतील तक्रार वाचून सदर व्यक्तीस सूचना देण्यात यावी, असे मोघम शेरे विश्वस्तांकडून देण्यात येतात. देवसंस्थानच्या तक्रारपुस्तिकेत तक्रार करणाऱ्या भाविकांशी संपर्क साधला असता त्यांनी अत्यंत तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या. कांदिवलीचे वैभव गायकवाड, डॉ. काळे, रमेश बलकवडे, सोलापूरचे भाविक शार्दूल व अनुराधा साळुंखे, भुसावळ येथील योगिता कस्तुरे, संदेश पाटील, तसेच अ. द. मानकर आदी भाविकांनी स्वत:च्या नावागावासह तक्रारी दिलेल्या आहेत. देवसंस्थानने याबाबत साधी चौकशीदेखील केलेली नाही. लुटारूंच्या विळख्यात गरिबांचा देव अडकला असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया या भाविकांच्या आहेत. ४पंढरपूरचा विठोबा जसा सर्वांसाठी मुक्त झाला, तसाच जेजुरीचा खंडेरायाही अवघ्या बहुजनासाठी मुक्त व्हावा. कुठेही, कसलीही दक्षिणेची सक्ती अथवा लूट होऊ नये, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे मुंबई येथील एका भविकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. देवसंस्थान कारभार, उत्पन्न आदींची संपूर्ण माहिती या भाविकाने संकलित केली असून, लवकरच ही याचिका दाखल केली जाणार आहे.भाविकांच्या तक्रारपुस्तिकेत येणाऱ्या तक्रारीबाबात त्या- त्या वेळी संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत. ज्यांच्या बद्दल गंभीर तक्रारी आहेत, त्या संदर्भात गेल्याच महिन्यात मासिक सभेच्या अजेंड्यावर विषय घेतला होता. मात्र, ती बैठक चार विश्वस्त गैरहजर राहिल्याने तहकूब करावी लागली होती. पुढील बैैठकीत या संदर्भात चर्चा घडवून योग्य ती कार्यवाही केली जाईल.- अॅड किशोर म्हस्के, प्रमुख विश्वस्त४जेजुरी देवसंस्थान, मंदिर व्यवस्थापन आदीत धमार्दाय आयुक्तांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. तर वेळ पडल्यास मढी येथील देवसंस्थानसारखा निर्णय येथेही घेतला जावा, येथे प्रशासक नेमावा, आदी प्रतिक्रिया भाविकांकडून आल्या आहेत. जेजुरीत कुलदैवताला भेटण्यासाठी येऊन भाविकांना अपशब्द ऐकावे लागतात, अपमानित व्हावे लागते, अशा घटना जेजुरीव्यतिरिक्त इतरत्र घडत नसल्याच्याही प्रतिक्रिया आहेत.