पांडुरंग मरगजे-
पुणे : कोरोनामुळे सध्या नातीगोती आणि माणुसकीचे अनेक चांगलेवाईट अनुभव समोर येत आहेत. कोरोनाच्या धास्तीने आजारांना बळी पडलेल्यांच्या नशिबी दु:स्वास आणि माणुसकी हरविल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र काही ठिकाणी माणुसकीचे दर्शन या घडीला देखील घडते आहे. परिस्थितीसमोर हतबल झालेल्या अनेक कुटुंबांसाठी ते ‘देवमाणूस’ ठरले आहे. या देवमाणसाचे नाव आहे चंद्रकांत मोरे.
मोरे हे भारती विद्यापीठ येथे वास्तव्याला असून त्यांची सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहे. त्यांनी लॉकडाऊन ते अनलॉक दरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या १२७ गरीब रुग्णांना तब्बल पंचवीस लाख ब्यायऐंशी हजार रुपयांचे बिल माफ करत मोफत उपचार उपलब्ध करून देत माणुसकीचे अद्भूत दर्शन घडविले आहे. या त्यांच्या कार्याबद्दल रुग्णांबरोबरच नातेवाईकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लाँकडाऊन जाहीर केला. शासनाने लागू केलेल्या लाँकडाऊन आणि संचारबंदीमुळे रूग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी लागणाऱ्या खचार्पासून रुग्णालयात दाखल करण्याप्रर्यत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशा परिस्थितीत चंद्रकांत मोरे यांनी रूग्णानां हाँस्पिटलमधे दाखल करण्यापासून त्यांना उपचार मिळवून देण्यापर्यंत सहकार्य केले. याशिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार, धमार्दाय आयुक्त कार्यालय व पुणे महापालिकेच्या उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती देऊन बिल माफ करून मोफत उपचार मिळवून दिले.
ज्या रुग्णांचे उत्पन्न ८५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांचे संपूर्ण बिल माफ करून घेतले तर ८५ हजार ते एक लाख साठ हजार रुपयांच्या दरम्यान आर्थिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांचे निम्मे बिल माफ करुन दिले. रूग्णांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत सर्व जबाबदारी मोरे यांनी सामाजिक भावनेतून पार पाडली. यामधील अनेक रुग्णांना परत घरी पोहचविण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडली.
............................
मागील दहा वर्षात अडीच हजार रुग्णांना मिळवून दिले मोफत उपचार
चंद्रकांत मोरे यांनी मागील दहा वर्षात अडीच हजार रुग्णांना मोफत उपचार मिळवून दिले आहेत. तर पोलीस दलास मदत म्हणून अपघातग्रस्त ४४२ मृतदेह उचलण्यासाठी मदत तर अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने ३३ जणांचे जीव वाचविले.