पुणे : शहरात घडणाऱ्या आगीच्या घटनांवेळी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कर्तव्य बजावत हे काम पार पाडतात खरे. सतर्कता व समयसूचकता या जवानांमध्ये कायम दिसून येते. नुकतीच दुपारी कोंढव्यात गोडावूनला लागलेली भीषण आग अशीच सतर्कता व समयसूचकता वडाचीवाडी येथे राहणारे फायरमन राहुल बांदल यांनी त्यांची सुटी असतानाही दाखविली.
घटना अशी की, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पिसोळी येथील हॉटेल आंबेकरजवळ असणाऱ्या एका घरामध्ये सिलिंडरने पेट घेतला अन् घरात आग लागली. तेथेच शेजारी राहणारे रोहित सोनी यांनी लगेचच त्यांचे मित्र जवान राहुल बांदल यांना फोन करून कळविले. जवान बांदल हे सुटी म्हणून घरीच असल्याने ते अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आपल्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. जवान बांदल यांनी घटनास्थळी कोणी अडकले का, याची खात्री करुन लगेचच घरातील दोन सिलिंडरवर एका नळीच्या साहाय्याने पाणी मारत सिलिंडर बाहेर काढले व मोठा धोका दूर केला. स्थानिकांच्या मदतीने पाण्याचा वापर करून पूर्ण आग आटोक्यात आणली. यामध्ये काही प्रमाणात घरगुती साहित्याचे नुकसान झाले. परंतु आग वेळीच आटोक्यात आणल्याने इतरत्र न पसरता मोठा अनर्थ टळला. जवान राहुल बांदल यांनी सुटीवर असताना देखील बजाविलेल्या या कर्तव्यामुळे तेथील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले व अग्निशमन दलाचेही आभार मानले.